झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडून जिल्हा आरोग्य विभागाचे कौतुक
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी कामात सुधारणा केलेल्यांचे कौतुक केले तर दिरंगाई करणाऱ्यांची कानउघाडणी केली.
शुक्रवारी सकाळी झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाचा विविध विषयाचा आढावा घेताला. त्यामध्ये सर्वप्रथम आपण जनतेचे सेवक आहोत,जनतेला आरोग्य सेवा देणे हे आद्य कर्तव्य आहे, याचा विसर न पाडता मुख्यालयात उपस्थित राहून सेवा देणे,सर्व अधिकारी कर्मचारी यांना बंधनकारक आहे.जे कोणी मुख्यालयात राहत नसतील व सेवा देण्यास हजगर्जीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या टिमने कुष्टरोग कार्यक्रमात सुधारणा केल्याबद्दल कौतुक तर इतर कामातदेखील सुधारणा करण्याचे सीईओ आव्हाळे यांनी निर्देश दिले. कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत सर्व ओ.टी. कार्यान्वित करण्यात यावेत. तसेच दोन अपत्यांमधील अंतर वाढविण्याकरिता शासनस्तरावरुन ज्या उपाययोजना आहेत, त्यांचे जनजागरण करावे.
प्रा.आ.केंद्र,उपकेंद्र.आर.एच.एस.डी.एचच्या ठिकाणी पुरेसा औषधसाठा असल्याबाबत प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक,यांनी खात्री करावी. तसेच त्या-त्या ठिकाणचे औषधनिर्माण अधिकारी यांनी औषधसाठा नोंदवहीत तसेच ऑनलाईन अहवालात अद्ययावत माहिती दररोज भरावी.जिल्हास्तरावरुन अचानक भेटी वाढविण्यात याव्यात. या भेटींमध्ये आरोग्यसंस्थेतील स्वच्छता,कर्मचाऱ्यांची उपस्थिती,देत असलेल्या सेवा, नोंदवहींचे अद्ययावतीकरण पाहून त्यावर आपला शेरा नमूद करण्यात यावा. यानंतर मी स्वतः अचानकपणे आरोग्य केंद्राला भेटी देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले. त्यावेळी या सर्व बाबी तपासण्यात येतील.ऑक्सिजन सिलेंडर साठा उपलब्धतेबाबत,माहिती अद्ययावत ठेवावी. काही कमतरता असल्यास वरिष्ठांशी याबाबत समन्वय साधावा.१०२,१०८,गाडीची संदर्भसेवा ,याबाबत माहिती विचारण्यात आली. आरोग्य संस्थांमध्ये ओ.पी.डी सेवेकरिता वैद्यकीय अधिकारी यांनीच उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच एकाच वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफ यांचे २४ तासांचे डयुटी चार्ट बदलून ८ किंवा १२तास डयुटी करावे. जेणेकरुन अत्यावश्यक सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा निष्काळजीपणा होणार नाही सूचना सीईओ आव्हाळे यांनी यावेळी दिल्या.
टि.बी.निर्मूलन कार्यक्रमाचे काम वाढवावे व आर.बी.एस.के. टीममार्फत शाळा,अंगणवाडी तपासणी करुन जी आजारसदृश्य बालके आढळतात, त्यांची जास्तीत जास्त तपासणी होऊन विविध सर्जरीचा गरीब बालकाना मोफत लाभ देण्यात येईल याची तत्परतेने काळजी घेऊन काम वाढवावे. तसेच शाळा,महाविद्ययालये,विविध संस्थांमध्ये ,गावातदेखील समुपदेशन करण्यात यावे. याबाबत ऑनलाईनदेखील या सेवेचा लाभ घेता येतो, याबाबत जनजागरण करावे,तर निश्चितच तणावग्रस्त लोकांचे जीव वाचवण्यात यश येईल, असे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.संतोष नवले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील,जिल्हा माता व प्रजनन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे,क्षयरोग अधिकारी,डॉ.मिनाक्षी बनसोडे,सहाय़यक जिल्हा आरोग्य अधिकारी,बिरुदेव दुधभाते,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिक्षक,सर्व कार्यक्रम समन्वयक (राष्ट्रीय आरोग्य अभियान ) तसेच जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.