सोलापूरच्या “या’ सरकारी रुग्णालयाने खाजगी रुग्णालयाची उडवली झोप

सोलापूर : सोलापुरात नव्याने सुरू झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाने खाजगी रुग्णालयाची झोप उडवली आहे. गेल्या दहा महिन्यात या रुग्णालयाने तब्बल 1 हजार 153 बाळंतपणे करून गरिबांना सेवा देण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये 804 सिझेरियन बाळंतपणे आहेत. सरकारी रुग्णालयाच्या या सेवेमुळे या परिसरात असलेल्या खाजगी सेवा देणाऱ्या रुग्णालयानी आपल्या दरामध्ये मोठी कपात केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल ) बाळंतपणासाठी प्रसिद्ध होते. सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भाग, धाराशिव, लातूर जिल्हयाबरोबरच कर्नाटक सीमावृत्ती गावातील अनेक लोकांचे हे हॉस्पिटल अनेक काळापासून आधारवड आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसूती दवाखान्यातील सेवेची परवड झाल्यानंतर शासकीय रुग्णालयावरील भार वाढला होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी 31 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री बाळंतपणावरून एक घटना घडली होती. प्रसूती कळांच्या वेदनेने तडफडणाऱ्या महिलेकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका डॉक्टरांच्या कानशिलात एका इंस्पेक्टरने ठेवून दिली होती. या घटनेनंतर हे प्रकरण बरेच तापले होते. त्यानंतर सोलापुरात महिला आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले होते. कोरोना महामारीनंतर महानगरपालिकेने प्रसूतीगृहाच्या कामकाजाकडे लक्ष दिले. तत्कालीन आरोग्य मंत्री विजयकुमार देशमुख यांनी महिला व बाल जिल्हा रुग्णालयाचा पाया घातला. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर जुन्या पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी हे हॉस्पिटल दिमाखात उभे राहिले. 13 मार्च 2024 रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. या काळात एक नॉर्मल डिलिव्हरीही झाली. त्यानंतर डॉक्टरांची पदे भरल्यानंतर एक एप्रिल 2024 पासून या रुग्णालयाची सेवा सुरू झाली. आत्तापर्यंत या रुग्णालयाने 344 नॉर्मल तर 804 सिझेरियन बाळंतपणे केली आहेत. त्याचबरोबर दुर्बिणीद्वारे व टाक्याच्या अशा 179 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. अजून ग्रामीण भागात बऱ्याच जणांना या रुग्णालयाची सेवा माहीत नाही. पण ज्यांना ज्यांना या रुग्णालयाचे नाव कळाले त्यांनी या रुग्णालयातील सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. नवीन देखणी इमारत व स्वच्छतेमुळे लोकांचा या रुग्णालयाकडे ओढा वाढला आहे. त्याचबरोबर या रुग्णालयात देण्यात येत असलेली सेवा चांगली असल्यामुळे सोलापूर शहराबरोबरच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि कर्नाटकातील महिला या रुग्णालयाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. या भागात यापूर्वीच खाजगी रुग्णालयाचीही सेवा आहे. पण नव्या जिल्हा व महिला बाल रुग्णालयाची ही सेवा पाहून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. साहजिकच खाजगी रुग्णालयातील ओघ कमी होऊ लागला आहे. त्यामुळे अशा रुग्णालयानी आपल्या सेवाशुल्कात कपात केल्याचेही आता सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातही गुणवत्ता असेल तर खाजगी सेवा यासमोर फिक्की पडते हे या जिल्हा व महिला बाल रुग्णालयाच्या सेवेवरून दिसून आले आहे. यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिलांना सेवा देणाऱ्या डॉ. सरदेसाई मॅडम सेवानिवृत्त झाल्यानंतर महिला रुग्णांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते. आता हीच परिस्थिती नव्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉ. जयश्री ढवळे यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रुग्णसेवेत त्यांनी चांगलेच लक्ष घातल्यामुळे अल्पावधीत या हॉस्पिटलचे नाव झाले आहे.
आम्ही महिलांसाठी 24 तास सेवा देत आहोत. अडलेल्या महिला बाळंतपणासाठी येत आहेत. त्यामुळे सिझेरियनचे प्रमाण जास्त आहे. अल्पकाळात लोकांनी आमच्या सेवेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. अजून आम्हाला बेबी केअर युनिट कार्यान्वित करावयाचे आहे.
डॉ. जयश्री ढवळे,वैद्यकीय अधिकारी