सोलापूर

झेडपीच्या 862 शाळांच्या भौतिक सुविधांची न्यायाधीश समितींकडून तपासणी

शाळेत न्यायाधीश का आले म्हणून शिक्षक व विद्यार्थ्यांना वाढली होती उत्सुकता

सोलापूर : जिल्ह्यातील 862 झेडपीच्या शाळेत जाऊन न्यायाधीशाच्या समितीने भौतिक सुविधांची पाहणी केली आहे. या पाहणीचा अहवाल खंडपीठाला सादर केला जाणार आहे.

संभाजीनगर खंडपीठअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमधून प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये त्या भागातल्या प्रमुख न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती पारित करण्याच्या सूचना संभाजीनगर खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिल्यानंतर जिल्हा न्यायाधीश मो.सलमान आझमी यांच्या निर्देशाप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. त्यांच्या समन्वयाने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अक्कलकोट नगरपरिषद, दक्षिण सोलापूर, मोहोळ, महानगरपालिका व उत्तर सोलापूर या तालुक्यातील एकूण ८६२ शाळांची तपासणी पूर्ण करण्यात आल्या आहेत. ही समिती शाळा तपासणी करताना न्यायाधीश आपल्या शाळेच्या समस्या जाणून घेण्यासाठी शाळेपर्यंत आल्यामुळे शिक्षकांमध्ये कुतुहल दिसून आले. न्यायाधीशाना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली. या समितीने शाळेतील समस्या जाणून घेताना अनेक शिक्षकाना गहिवरून आले. शिक्षकांनी आपल्या शाळेच्या सर्व भौतिक समस्या समितीपुढे मांडल्या. यात शाळेची इमारत, वर्ग खोल्यांची स्थिती, विजेची सोय, स्वच्छतागृह, पिणे व वापराच्या पाण्याची सुविधा, कंपाउंड, बेंचेसची सुविधा अशा अनेक समस्या या समितीने पाहणी करून त्यांची नोंद घेतली. या समितीच्या भेटीनंतर प्रशासनाने शाळांमधील गैरसोयी दूर करण्याबाबत पावले उचलल्याचे दिसून आले. या समितीच्या भेटीमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या दूर झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

पापरी शाळेत समारोप…

मोहोळ तालुक्यातील पापरी शाळेत या भेटीचा समारोप करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी समितीच्या भेटीनंतर शाळेत सकारात्मक बदल होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
समिती बरोबर आलेले पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे आणि हा स्तंभ भक्कम करावयाचा असेल तर शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळामध्ये गोरगरिबांची मुले शिकतात. मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकलो याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे सांगितले आहे. यावेळी समितीचे सचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी, विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे कार्य पहिली आई करते तर दुसरी शाळा करत असते. म्हणून शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. खंडपीठाच्या नियमाचे काटेकोर पालन करून सर्वाधिक शाळा कमी कालावधीत तपासणी पूर्ण करणारा सोलापूर जिल्हा पहिला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या समितीमध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधिश मो. सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली हे काम अतिशय काटेकोरपणे पूर्ण केले आहे. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या समस्या मला या याचिकेमुळे जाणण्याचा योग आला. शाळेमध्ये जो सकारात्मक बदल घडेल, त्याचे श्रेय उच्च न्यायालय व प्रमुख जिल्हा न्यायाधीश मो. सलमान आझमी यांना जाते.
या समितीच्या माध्यमातून शाळेच्या समस्या जसेच्या तसे आम्ही हायकोर्टाला अहवालात सादर करू. परंतु शिक्षण विभागातील सर्व अधिकार्यानी शाळेच्या समस्या कशा दूर होतील, त्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशी सूचना केली. शाळा तपासणी पूर्ण होण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या समन्वयक सुप्रिया मोहिते, शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे, गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त पी. एन. सोनवणे, ग्रामीण पोलीसच्या उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुरी, अमोल भारती, तालुक्याचे प्रांताधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, मल्लिनाथ स्वामी, दयानंद कवडे व गुरुबाळ सणके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button