सोलापूरजिल्हा परिषद

सोलापुरात झेडपीचा ‘लेक लाडकी” चित्ररथ लक्षवेधी

सोलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयात झालेल्या  संचलनात  सोलापूर झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागाने सादर केलेल्या ‘लेक लाडकी” या चित्ररथास कौतुकाची थाप मिळाली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे , पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विभाग, परिवहन विभाग, अग्निशमन विभाग, महिला व बालविकास विभाग अशा विविध विभागानी त्यांच्याकडील योजनांची प्रसिद्धी व जन जागृती चित्ररथाद्वारे केली.तथापि या सर्व चित्ररथामध्ये जिल्हा परिषद महिला व बालविकासाच्या चित्ररथाने उपस्थित अधिकाऱ्यांची कौतुकाची थाप मिळवली.

महिला व बालविकास विभागाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या र्गदर्शनाखाली लेक लाडकी, बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच सही पोषण देश रोशन या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार केला होता.

यामध्ये कु ध्रुवी मेहेरकर, कु कालिका सगरे, कु संस्कृती सगरे, कु मीरा मेहेरकर , वरद देशमुख आणि ओजस आल्लडवाड या चिमुकल्यानी पोषण आहाराची वेशभूषा करून ‘सही पोषण देश रोशन” असा नारा देत उपस्थितांची मने जिंकली.

लहान बालकांना सध्याच्या काळात जंक फूडचे व्यसन लागले असून पालक देखील बालकांचा जंकफूड खाण्याचा हट्ट पुरवतात. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत असून सकस आहार कसा असावा ? आहारात फळे , पालेभाज्या , दुग्धजन्य पदार्थ , तृणधान्ये यांचा समावेश करावा हा या चित्र रथाचा उद्देश असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी देखील पालकांना त्यांच्या मुलांना मोबाईल व जंकफूड पासून दूर ठेवावे व एक सुपोषित भारत निर्माण करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.

चित्ररथाचे नियोजन बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अलडवाड , शिवानंद मागे , वरिष्ठ सहायक सचिन आंबेकर , साहेबराव देशमुख , रेणुका प्रथमशेट्टी आणि विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button