सोलापूर झेडपीच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आणखीन एक गुड न्यूज
मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम यांनी केली मोठी तयारी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे. जवळपास 250 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने नियुक्त्या देण्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यापासून कर्मचाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी शिपाई पदाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नियुक्त दिल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच त्यांनी कर्मचाऱ्यांना आणखीन एक आनंदाचा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायकांना सहायक अभियंता, आरोग्य विभागात अनेक दिवसापासून रखडलेल्या पदोन्नत्यांना मुहूर्त लावत आरोग्यसेवक, परिचारांना मोठी संधी देण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागातील शिक्षकांना मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. तीन वर्षानंतर पदोन्नत्यांना मूहुर्त लागणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. पदोन्नतीनंतर त्यांना आवडीच्या ठिकाणी समुपदेशाने नियुक्त्या मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची तयारी केली आहे. यामुळे बऱ्याच खात्यात रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदांना अधिकारी मिळणार आहेत. यामध्ये बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा खात्याकडे रिक्त असलेली अनेक पदे भरली जाणार आहेत. शिक्षण व आरोग्य खात्याच्या सुधारणेकडेही त्यांनी लक्ष दिले आहे. आरोग्य विभाग हा माझ्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही काळजी घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.