झेडपीच्या शाळेत भ्रष्टाचार, कायद्याचे उल्लंघन खपवून घेणार नाही
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा शिक्षकांना इशारा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तेच्या आधारावर सेवेत लागलेल्या शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील राहावे. भष्ट्राचार, बाल संरक्षण कायदा भंग करणाऱ्यांना अजिबात थपवून घेतले जाणार नाही असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिला.
शिक्षक संघटनांची मुख्यकार्यकारी अधिकारी जंगम यांच्यासोबत सुमारे चार तास शिक्षक प्रश्नांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन किरकोळ विषय निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी व निवडश्रेणी सारखा विषय आचारसंहिता संपल्यावर कालमर्यादेत करू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतःहून सोमवारी शिक्षक संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या सुमारे वीस ते पंचवीस प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शिक्षक संघाच्यावतीने संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष म. ज . मोरे, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे व महिला आघाडीच्या अध्यक्षा चंदाराणी आतकर यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या मांडल्या. म. ज . मोरे यांनी पात्र शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर करा व अनेक वर्षापासून रखडलेल्या निवडश्रेणी चा लाभ द्या , शाळेमध्ये मुख्याध्यापक चार्ज घेण्याविषयी अनेकांमध्ये संभ्रम अवस्था आहे त्याविषयी सुस्पष्ट आदेश काढावा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे अनुदान स्पर्धेपूर्वी द्यावे व जिल्हास्तरावर सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्याना किमान सहभाग प्रमाणपत्र देण्यात यावे. सेवानिवृत्तीपूर्वी शिक्षकांना सर्व शाळांमधून एनओसी देण्याची सक्ती न करता निवृत्तीवेतन मंजूर करावी. तसेच वैद्यकीय अग्रीमधनाची रक्कम बीडीओंना पूर्वीप्रमाणेच त्वरित द्यावी अशा मागण्या केल्या. अनिरुद्ध पवार यांनी वैद्यकीय देयके, फंड प्रकरणे व शिक्षकांच्या वेतनास विलंब होत असल्याचा विषय व केंद्र प्रमुखांचे थकीत वेतनाचा तसेच डायटचा वाढता हस्तक्षेप आदी विषय लावून धरले. वरिष्ठ वेतनश्रेणीची फाईल मंजूर करण्याची व बीएलओ या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करण्याची विनंती केली. सूर्यकांत हत्तूरे यांनी त्यांच्याबरोबर नाशिक जिल्हयात 1995 ला लागलेला शिक्षक निवड श्रेणी घेतो आणि आपल्या जिल्हयात मात्र मागिल दहा वर्षापूर्वी सेवानिवृत झालेल्या शिक्षकालीही याचा लाभ मिळाला नाही याविषयी खंत व्यक्त करून हा विषय प्राधान्याने सोडवण्याची व विज्ञान विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, समाजशास्त्र विषय शिक्षक नकार मंजूर करून त्यांच्या समायोजनाकरिता तालुक्यात जागा नसेल तर नव्याने शिक्षक भरती व आंतरजिल्हा बदलीने शिक्षक संख्या वाढल्याने समानिकरणात लवचिकता आणून अशा शिक्षकांसाठी या जागा रिलीज करण्याची विनंती केली. चंदाराणी आतकर यांनी शिक्षकांना भयमुक्त वातावरणात आनंददायी शिक्षण देऊ द्या. शनिवारचा दप्तरविना शाळेचा उपक्रम निरंतर चालु राहु द्या अशी मागणी केली. शेवटी सीईओना मागण्यांचे लेखी निवेदन दिले.संघटनांच्या विविध मागण्या मांडल्यानंतर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत कोणते प्रश्न कसे सोडविता येईल किंवा त्यात येणाऱ्या अडचणींवर कसे मात करून निर्णय घेता येईल हे सांगितले.
सभेच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सभेत मांडल्या गेलेल्या सर्व विषयांवर भाष्य करित “आज मीटिंग झाली आणि उद्या सर्वच काम झाले असे होत नाही. याकरिता sop पद्धतीने काम केले जाईल, सर्व कामांना प्राधान्यक्रम देऊन टप्प्याटप्प्याने ते सोडवण्यात येईल. यातील किरकोळ विषय निवडणूक आचारसंहिता लागु होण्यापूर्वी व निवडश्रेणी सारखा वेळखाऊ व किचकट विषय निवडणूक आचारसंहिते नंतर सोडविला जाईल असे सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तेच्या आधारे सेवेत लागलेल्या शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.