सेवानिवृत्तीला 11 महिने झाले अद्याप नाही पीएफ, गटविमा
झेडपी आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तक्रार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजासंबंधी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना लक्ष घालण्याबाबत पत्र दिल्यानंतर आणखी एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याने कैफियत मांडली आहे. सेवानिवृत्तीनंतर 11 महिन्यांनीही पीएफ, रजा रोखीकरण व गटविम्याची रक्कम दिली नसल्याची त्यांची तक्रार आहे.
आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सुनंदा सुरवसे यांनी आठ जूनला मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पत्र दिले आहे. सुरवसे या आरोग्य विभागाच्या पंढरपूर तालुक्यातील खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रातून 37 वर्षे नऊ महिने सेवा करून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर पाच महिन्यांनी त्यांना पेन्शन मंजूर करण्यात आले. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण आणि गट विम्याची रक्कम मिळण्याबाबत त्यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. एप्रिल 2024 मध्ये रजा रोखीकरणासाठी अनुदान मंजूर झाल्यानंतरही त्यांना अनुदान अदा करण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कैफियत मांडूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सीईओकडे अर्ज दिला. या अर्जाची दखल न घेतल्यास लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण दोन महिन्यानंतरही त्यांच्या अर्जावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे झेडपी प्रशासन निवृत्ती दिवशीच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व देय रकमा देण्याबाबत कृतिशील असल्याचे दिसून येते पण दुसरीकडे विभागाकडून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका नसल्याचे दिसून येत आहे. सीईओ मनीषा आव्हाळे ही तक्रार किती गांभीर्याने घेतात याकडे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.