सोलापूर जिल्ह्यात बारावीची कॉपी तपासण्यासाठी 46 भरारी पथकांची नियुक्ती
पर्यवेक्षक देणार विद्यार्थ्यांना बाटलीतील पाणी

सोलापूर : बारावीच्या परीक्षेला बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महसूल विभागाची २८ तर जिल्हा परिषदेची १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दहावी किंवा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवेळी कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्यांला एक ते तीन वर्षे पुन्हा परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी
जिल्ह्यातील सहा प्रांताधिकारी, ११तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समित्यांचे ११ गटविकास अधिकारी, माध्यमिक, प्राथमिकचे
शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठे पथक म्हणून नेमले जातील. तर उर्वरित परीक्षा केंद्रावर अंगणवाडी पर्यवेक्षक, महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, जिल्हा परिषद में खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथकात एकूण तीन सदस्य असतील, त्यात एक महिला सदस्य असणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांची अंग झडती घेतली जाईल. हा बोर्डाचाच नियम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपस्थित होत्या.
पाणी वाटप कर्मचारी नसणार
परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नाही. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षक स्वतःकडे पाण्याची बाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांचे चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पेपर लिहिण्यासाठी वापरण्याचे पॅड ही पारदर्शक असावेत अशा सूचना मुख्याध्यापकांमार्फत यापूर्वीच करण्यात आलेल्या आहेत.
अशी आहे परीक्षार्थींची संख्या
बारावी-५२,८७०
परीक्षा केंद्रे-११८
दहावी – ६५,७४९
परीक्षा केंद्र-१८२
भरारी पथके-४६
परीक्षा कॉपीमुक्त व्हावी
यासाठी महसूल व जिल्हा परिषदेची भरारी
पथके तालुकानिहाय शाळांना भेटी देतील, जिल्हा परिषदेच्या ११ विभाग प्रमुखांसह माध्यमिक, प्राथमिक व महापालिका शिक्षण मंडळ, ‘डायट’ चे प्राचार्य, योजना विभागाचे ‘शिक्षणाधिकारी यांची एकूण पाच आणि माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन विशेष पथके देखील नेमण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. –
मारुती फडके
माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
.