
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील वडापूर येथे भीमा नदीवर धरण बांधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली.
स्वयंशिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापुरात आगामी विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने दौरा सुरू केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा त्यांनी धडाका सुरू केला आहे. सोमवारी त्यांनी दक्षिण सोलापुरातील वांगी, लवंगी, सादेपूर व औरादचा दौरा केला. लवंगी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकरी कोळी यांनी कर्नाटक सरकारने भीमा नदीवर बांधलेल्या अत्याधुनिक बंधाऱ्याची माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांनी कर्नाटक सरकारने बांधलेल्या या बांधाऱ्याला भेट दिली. कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधलेल्या या बंधाऱ्याचे त्यांनी कौतुक केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून वडापूर येथे धरण बांधण्याची फक्त चर्चाच होत आहे. पण लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक सीमावृत्ती भागातील शेतकऱ्यांवर सतत अन्याय होत आला आहे. उजनीचे पाणी कालव्याद्वारे मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेसे मिळत नाही. टेल एंडचे हे तालुके असल्याने केवळ एक किंवा दोन दिवस कालव्याचे पाणी मिळते. यावर पुरेसे सिंचन होत नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळीच राहिला आहे. वडापूरला दोन टीएमसी क्षमतेचे धरण झाले असते तर यातून कालव्याद्वारे मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळाले असते. उजनी धरण मायनसमध्ये गेले तरी या धरणातून शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य होणार आहे. पण शेतकरी मोठे होतील या आकसापोटी तालुक्यातील नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीने वडापूर धरणाच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मी मंत्रालयात काम केले असल्यामुळे कोठे कोणते काम करायचे याची मला चांगली जाण आहे. त्यामुळे वडापूरला धरण उभे केल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही असे अभिवचन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
कर्नाटक सरकारचे कौतुक…
महाराष्ट्राच्या सीमेवर भीमा नदीवर कर्नाटक सरकारने 173 कोटी खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक बंधारा व पुलाच्या कामाबद्दल सोमनाथ वैद्य यांनी कर्नाटक सरकारचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकारच टिकून राहणार आहे. कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे पण महाराष्ट्र सरकार वडापूर धरणाबाबत केवळ विचारच करत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न पुढे करून महाराष्ट्रातील भिमेकाठच्या शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज पुरवठा केला जातो हा मोठा अन्याय आहे. कर्नाटक सरकार चोवीस तास मोफत वीजपुरवठा करीत आहे.त्यामुळे नदी पलीकडचा भाग सुजलम सुफलम झाल्याचे आपल्याला दिसत आहे. सोलापूर बाजार समितीला कर्नाटकातूनच मोठ्या प्रमाणावर फळे व भाजीपाल्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी सधन बनला आहे. अशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी वडापूरच्या धरणाची निर्मितीसाठी मी जीवाचे रान करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.