सोलापुरातील नेहरू वस्तीगृहात काय घडलं?

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या नेहरू वस्तीग्रहामध्ये पीएमश्री योजनेबाबत माहिती देण्यासाठी शालेय समितीच्या अध्यक्ष व सचिवसाठी बोलवलेल्या बैठकीला प्राथमिक शिक्षण विभागाचे संयोजकच गायब झाल्याने गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयकांना संपर्क साधल्यानंतर माझ्यावर मेहरबानी केली का? शक्य नसेल तर निघून जावा, असे मुजोरीचे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. शिक्षण विभागातील अधिकारीच असे वागू शकतात अशा या प्रकाराबाबत पालक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने पीएमश्री योजनेबाबत जिल्हा परिषद शाळांमधील शालेय समितीच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक बोलावली होती. ही बैठक गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नेहरू वस्तीग्रह येथे होणार होती. निरोप मिळाल्याप्रमाणे जिल्ह्यातून शालेय समितीचे पदाधिकारी नेहरू वस्तीग्रहात दाखल झाले. पण याठिकाणी याचवेळी दिव्यांगाचे शिबिर सुरू होते. त्यामुळे अडीच वाजता बैठक घेऊ म्हणून समन्वयक निघून गेले. पण या बदलाची बऱ्याच जणांना माहिती नव्हती. बराच वेळ वाट पाहून काही पदाधिकाऱ्यांनी बार्शीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व पीएमश्री योजनेचे समन्वयक, विस्तार अधिकारी गुरव यांना संपर्क साधला. विस्तार अधिकारी गुरव यांनी त्यांना बदलाची माहिती देण्याऐवजी तंबी देण्यास सुरुवात केली. त्यावर शालेय समितीचे पदाधिकारी आम्ही काही तुमचे कर्मचारी नाहीत आम्हाला बैठकीला तुम्ही बोलाविले आहे, ठरल्या वेळेप्रमाणे बैठक घ्या अशी विनंती केली. त्यावर विस्तार अधिकारी गुरव यांनी तुम्हाला माझा नंबर कोणी दिला. बैठकीबाबत तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना बोला. बैठकीला आला म्हणजे माझ्यावर मेहरबानी केली का. शक्य नसेल तर तुम्ही निघून जाऊ शकता. बैठकीला आलाच आहात तर दिवसभर तुम्ही बांधील आहात. तुम्ही कोण मला सांगणार. तुम्हाला त्रास होत असेल तर परत जावा असे उत्तर दिले. विस्तार अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याशी संपर्क साधला व घडलेली हकीकत सांगितली. शिक्षणाधिकारी शेख यांनी पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत विस्तार अधिकारी गुरव यांना नेहरू वस्तीग्रहावर पाठवले. बैठक घेण्यास आल्यावर पुन्हा विस्तार अधिकारी गुरव यांचा तोरा चढलेलाच दिसून आला. इथे आलेले किती पंडित व किती हुशार आहेत हे मला माहित आहेत, असे ते म्हणताच पुन्हा पदाधिकाऱ्यांचा पार चढला. माफी मागा नाही तर आम्ही बैठकीतून निघून जातो अशी भूमिका त्यांनी घेतली. मुख्याध्यापकांनीच पुढाकार घेत माफी मागून कशीतरी बैठक उरकली…
अधिकारी कसे वागतात पहा व्हिडिओ…