फडके गुरुजींनी पेन्शन, पीएफची प्रकरणे काढली निकाली
तक्रारी स्वीकारण्याबरोबर कोर्ट प्रकरणांचा घेतला आढावा

सोलापूर : माझ्या शिक्षकांना पेन्शन तर मला निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल, असे म्हणत माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी पहिल्याच दिवशी शिक्षकांचे पेन्शन व भविष्य निर्वाह निधीच्या फायली निकालीत काढल्या आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके प्रकृती अस्वस्थ त्यामुळे दीर्घ रजेवर गेले होते त्यामुळे शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकरणे रखडली होती. फडके मंगळवारी सायंकाळी कामावर हजर झाले. बुधवारी त्यांनी कामकाजास सुरुवात केली. अनेक शिक्षक व कर्मचारी जुनी प्रकरणे घेऊन तक्रारी मांडत होते त्यांच्या तक्रारी ऐकून फाईल कोणाकडे आहे याबाबत ते चौकशी करीत होते पण माध्यमिक विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा असल्यामुळे अनेकांची कामे होत नव्हती. त्यावर शिक्षणाधिकारी फडके यांनी तुमची फाईल शोधून बोलावतो असे आश्वासन देऊन सर्वांना मार्गी लावले.
कोर्ट प्रकरणांचा त्यांनी आढावा घेतला. जवळपास अडीचशे प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबतच्या फायली जागेवर नसल्याचे दिसून आले. दहा प्रकरणात अवमान याचिका दाखल झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे अशा प्रकरणांना तातडीने उत्तर देण्यासाठी फायली तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जुने लिपिक कार्यालयात उपस्थित नसल्याने या फायलींचा शोध घेणे अवघड असल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तक्रारी स्वीकारून उपशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची तपासणी व अधीक्षकांनी खातर जमा करूनच माझ्याकडे फायली पाठवाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.
पेन्शन प्रकरणांचा निपटारा
पहिल्याच दिवशी शिक्षणाधिकारी फडके यांनी पेन्शन भविष्य निर्वाह निधी आणि वैद्यकीय बिलांच्या फायलींचा निपटारा केला. आत्तापर्यंत इथे जितके शिक्षणाधिकारी होऊन गेले त्यांना पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे रीतसर कामे तत्काळ मार्गी लावून सर्वांच्या आशीर्वादाने मला पेन्शन घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. रजेच्या काळातही काम चांगले झाल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज गतिमान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार सुधारण्यावर त्यांनी भर दिला आहे. आणखी कर्मचाऱ्यांची गरज असून लवकरच कार्यालयाचे कामकाज गतिमान करण्यात येईल व माध्यमिक विभागाची बदनामी थांबवण्यात येईल, अशी त्यांनी माहिती दिली.