सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण
कट्टीमणी गुरुजीच्या उपोषणाची शिक्षण विभागाने घेतली दखल

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष महांतेश कट्टीमनी यांनी अक्कलकोट तालुक्यांमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्या मनमानी, अधिकाराचा गैरवापर व आर्थिक देवाणघेवाण करून ज्या प्रतिनियुक्त्या झालेल्या होत्या, त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे संतापून मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्याविरुद्ध चुकीची तक्रार देण्यास लावून कट्टीमनी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी आरबळे यांच्या विरोधात आता मागासवर्गीय शिक्षक संघटना प्रचंड आक्रमक झाली असून मंगळवारी जिल्हा परिषदेच्या गेट समोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागाने कट्टीमनी गुरुजींना पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे.
अक्कलकोट तालुक्यात चुकीच्या पद्धतीने झालेल्या प्रतिनियुक्ती संदर्भातील चौकशीचा अहवाल लवकरात लवकर संघटनेला देण्यात येऊन संबंधित गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांची वरील प्रकरणात चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटना यापुढील कालावधीत न्याय मिळेपर्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी या निवेदनाची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागाला पुढील उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यालयात नसल्याने अधीक्षक होळकर यांनी मुख्याध्यापक कट्टीमनी यांना लेखी आश्वासन देत 15 दिवसात सर्व ती चौकशी पूर्ण करून उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन तुर्त मागे घेण्यात आले आहे.