पुरस्कार प्राप्त पंचायत समितीतून दिवसा दुचाकी गायब
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग होणार काय?

सोलापूर : यशवंत पंचायतराजचा पुरस्कार मिळवलेल्या अक्कलकोट पंचायत समितीच्या आवारामधून मंगळवारी दिवसा कर्मचाऱ्याची दुचाकी गायब झाली आहे. जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या सुरक्षेसाठी आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराविषयी आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सलगर ग्रामपंचायत मधील संगणक ऑपरेटर सद्दाम बिराजदार हे कामानिमित्त सोमवारी दुपारी अक्कलकोट पंचायत समितीत आले होते. सायंकाळी उशिरा काम संपल्यानंतर त्यांनी अक्कलकोट पंचायत समितीच्या आतमध्ये पार्क केलेली आपली दुचाकी शोधली. पण दुचाकी जागेवर सापडली नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर त्यांना दुचाकी गायब असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी सरपंचांकडे तक्रार केली. पंचायत समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गाडी कोणी नेली याचा शोध घेण्यात येत आहे. बिराजदार यांनी जिथे गाडी लावली होती तिथे दुसरी तशीच गाडी आहे. त्यामुळे कोणी चुकून त्यांची गाडी नेली का? याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
अक्कलकोट पंचायत समितीला गतवर्षी पंचायत राज समितीचा पुरस्कार मिळाला आहे. या पंचायत समितीत जिल्हा परिषदेने सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पण यातील बरेच कॅमेरे बंद असतात अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
धक्कादायक माहिती समोर…
ही बातमी ‘सोलापूर समाचार” वर प्रसिद्ध झाल्यानंतर गाडीच्या शोधाबाबत बरीच धावपळ झाली. यातून आता धक्कादायक माहिती समोर आहे. बिराजदार यांनी मित्राची दुचाकी आणली होती. या दुचाकीचे हप्ते न भरल्यामुळे फायनान्सने ही दुचाकी ओढून नेल्याचे सांगण्यात आले.