जिल्हा आरोग्य विभागाने केली माघी वारीतील वारकऱ्यांची सेवा

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतले असतानाच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र पंढरपुरात मागे वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची सेवा बजावली.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत गेल्या तीन दिवसापासून सोलापुरात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आनंद लुटला. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा आनंद घेता आला नाही. पंढरपुरातील माघी यात्रेनिमित्त दाखल झालेल्या सुमारे सहा लाख नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी हे कर्मचारी गुंतले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मागीवारीच्या काळात वारकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी पंढरपुरात ठाण मांडून आरोग्य सेवेच्या यंत्रणेवर देखरेख केली. माघी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी दर्शन मंडप वाळवंट, पत्राशेड, 65 एकर, पोलीस संकुल, बाजीराव विहीर या ठिकाणी औषध उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याचबरोबर उलट्या जुलाब व उन्हाचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, साथरोग हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्याची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर मंदिर व शासकीय विश्रामगृह येथे तज्ञ डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात आले होते. वारकऱ्यांना जलजन्य आजाराचा त्रास होऊ नये यासाठी नगरपंचायतीमार्फत पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. कीटकांचे आजार टाळण्यासाठी नागरी हिवताप केंद्राची टीम सज्ज ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर 108 व 112 या दोन ॲम्बुलन्स तयार ठेवण्यात आल्या होत्या. सात वैद्यकीय अधिकारी, 16 परिचारिका, 115 अशा वर्कर, 12 समुदाय अधिकारी त्याचबरोबर आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांची टीम वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार होती.
पंढरपूर माघवारी निमित्त 65 एकर,वाळवंट, पत्राशेड येथे वारकरी भाविकांसाठी दिलेल्या आरोग्यदायी सुविधांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचनापर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेची आरोग्य व नगरपालिकेची यंत्रणा कार्यरत असल्याने वारकऱ्यांना आरोग्याचा त्रास जाणवला नाही. आरोग्य विभागाने केलेल्या सुविधांचा अनेक वारकऱ्यांनी लाभ घेतला.