March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उचलबांगडीची तयारी

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणाच्या तक्रारी गेल्या आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांच्या उचलबांगडीची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पालकमंत्री जयकुमार गोरे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यापर्यंत माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधीनी माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या लहरीपणाबाबत लक्ष वेधले आहे. शासकीय विश्रामधाममध्ये शिक्षण अधिकारी जगताप यांनीही पालकमंत्री गोरे यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले.आपल्यावर सुरू असलेल्या कार्यवाहीची कुण कुण लागताच त्यांनी काही लोकप्रतिनिधींचे समर्थन घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून आलेली प्रकरणे जाणीवपूर्वक बाजूला ठेवणे, न्यायालयाचा आदेश असतानाही त्यावर सुनावण्या घेणे, शिक्षण संस्थानी अनुकंपावर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणे, शिपाई किंवा परिचर पदावर कर्मचारी घेतला असेल तर तुला शिक्षक करायला लावतो असे सांगून फाईल बाजूला ठेवणे, असे अनेक किस्से पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी जगताप यांच्याविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दाखल घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे उचलबांगडी होईल, अशी लोकप्रतिनिधीमध्ये चर्चा आहे.

अन गडबडले जगताप…

माळशिरस तालुक्यातील माजी झेडपी सदस्यांनी त्यांच्या संस्थेत एका शिपायाला पदावर रुजू केले आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे. असे असतानाही शिक्षणाधिकारी जगताप यांनी या आदेशावर सुनावणी लावली आहे. त्यामुळे संतापलेले ते झेडपीचे माजी सदस्य बुधवारी तावतावाने झेडपीत आले होते. त्यानी याबाबत खडसावून जाब विचारल्यावर मात्र शिक्षणाधिकारी जगताप हे गडबडले.अँटी चेंबरमध्ये त्यांना नेऊन प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत माजी आमदारानी केलेला कॉलही जगताप यांनी टाळला. हेही प्रकरण पालकमंत्री गोरे यांच्यापर्यंत गेल्याचे सांगण्यात आले.