सोलापूरराजकीय

सोलापुरात महापालिकेसाठी दोन देशमुखांचे ठरलं!

सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरू असून इतर पक्षात मात्र बंडाळी वाढली आहे. भाजपमधील  इनकमिंगमुळे निष्ठावंताची डोकेदुखी वाढली असली तरी आपल्याच कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा यासाठी दोन देशमुख यांनी शुक्रवारी बैठक घेतली आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील मंडळींचे इनकमिंग वाढविले आहे. यामुळे निष्ठावंतांना नगरसेवक पदाचे तिकीट मिळणार की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. सोलापूर शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघानुसार आपल्या मर्जीतील कोणत्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाचे तिकीट द्यायचे हे त्यांनीच ठरवायचे असा आतापर्यंतचा शिरस्ता होता. पण इनकमिंग वाढविल्यामुळे व याबाबत दोन देशमुख यांना विश्वासात न घेतल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री गोरे यांच्याशी जवळीक असलेले सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर उत्तर मध्ये आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी 15 जागांची मागणी केली आहे कोठे यांच्या अतिक्रमणामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे. संतापलेल्या आमदार विजयकुमार देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर आमचे कार्यकर्ते कुठे का असेनात त्यांना निवडून आणणार अशी जाहीर वाच्यता केल्यामुळे भाजपमधील अस्वस्थता वाढली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा होत असतानाच शुक्रवारी सकाळी आमदार सुभाष देशमुख यांनी विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत या दोघांनी बरीच खलबत्ते केल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या दोघांनी आता चांगलाच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये एन्ट्री मारलेल्यांचे काय होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button