सोलापूरजिल्हा परिषद

झेडपीच्या नेहरू वस्तीगृहातील 13 गाळेधारकांना नोटीसा

मयत, पोट भाडेकरू, भाडे थकविल्याचे आहे कारण

सोलापूर : सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील झेडपीच्या नेहरू वस्तीगृहाच्या इमारतीमधील 13 दुकान गाळेधारकांना बांधकाम विभागाने नोटीसा बजावल्या आहेत.

सोलापूर शहरातील प्राईम भागात जिल्हा परिषदेच्या मालकीचे नेहरू वस्तीगृह आहे. या वसतीगृहाच्या इमारतीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोक्याच्या ठिकाणी सतरा गाळे आहेत. या चौकातील इतर इमारतीतील गाड्यांपेक्षा झेडपीच्या या इमारतीच्या गाळ्यांमधील दुकानांना भाडे कमी आहे. त्यामुळे झेडपीच्या उत्पन्नात घट येत आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीच्यादृष्टीने या गाड्यांची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. या इमारतीच्या देखभालीसाठी 75 लाख खर्च येत असून उत्पन्न मात्र 53 लाखावर आहे. या इमारतीतील बऱ्याच गाड्यांचे करार संपले आहेत. यातील मूळ दोन करारदार मयत झाले आहेत तर काही गाळ्यांमध्ये पोट भाडेकरू असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात यातून एक कोटी 49 लाखाची भाडेवसुली अपेक्षित असताना केवळ एक कोटी बारा लाख रुपये वसुली झाली आहे. बऱ्याच गाळेधारकानी 29 लाख रुपये भाडे थकविले आहे. झेडपीच्या उत्पन्न वाढीचा अंदाज घेतल्यानंतर या वसतिगृहातील गाळे भाडे वसुलीचा विषय चर्चेला आला. यातील दोन करारदार मयत झाले आहेत तर काहींनी पोटभाडेकरू ठेवले आहेत तर काहींनी भाडे थकविले आहे. करार संपलेले व वरील कारण असलेल्या 13 गाळेधारकांना नोटीसा बजावण्यात आले आहेत. ज्या गाळ्यांचा भाडेकरार संपला आहे असे गाळे परत ताब्यात घेऊन लिलावाद्वारे पुन्हा भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. नोटीसा मिळाल्यानंतर काही गाळेधारकांनी त्यातून काही मार्ग निघतो का? याबाबतही चाचपणी केल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button