नांदेडच्या दौऱ्यानंतर कृषीमंत्री भरणेमामांचे सोलापूरकडे लक्ष
टंचाई स्थितीवर उद्या पुणे विभागाची बैठक

सोलापूर : नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे लक्ष आता सोलापूर जिल्ह्याकडे वळले आहे. जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या पुणे विभागीयस्तरावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पावसाअभावी सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिके हातची गेली आहेत. काही ठिकाणी पेरणी झालीच नाही तर जिथे पेरणी झाली तेथील पिके पावसाळा अभावी वाळून गेली आहेत. आता खरीप हंगामातील परतीच्या पावसाचाही सोलापूर जिल्ह्यात पत्ता नाही. कडक उन्हामुळे टंचाईच्या झळा जाणू लागल्या आहेत. पिण्याचे पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप पिके हातचे गेले आणि रब्बीचा हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी नांदेड चा दौरा केला. बांधावर जाऊन त्यांनी पीक पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी त्या विभागातील भीषण परिस्थिती पाहून कृषी मंत्री भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री भरणे यांनी सोमवारी पुणे विभागाचे बैठक बोलवल्याचे सांगण्यात आले आहे.



