माध्यमिक शिक्षण विभागातील कामासाठी कार्यालयासमोर झेडपी सदस्याचा ठिय्या
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरणावर पडदा

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागात एका शाळेच्या शिक्षकाचे काम होण्यासाठी दबावतंत्राचा वापर करीत शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर ठिय्या मारणाऱ्या झेडपी सदस्याला शांत करण्यासाठी अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांना हस्तक्षेप करावा लागल्याची घटना बुधवारी घडली.
मंद्रूप जिल्हा परिषद गटाचे सदस्य सोनाली कडते व त्यांचे पती प्रशांत कडते यांनी बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. ही माहिती मिळताच शिक्षणाधिकारी जगताप हे तेथे आले व त्यांनी या दोघांना कार्यालयात येण्याची विनंती केली. सत्ताधारी सदस्य असून आमची कामे होत नाहीत, त्यामुळे आम्ही आत येणार नाही असा हट्ट कडते यांनी धरला. माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनीही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. झेडपी सदस्यानेच ठिय्या मारल्याने तेथे गर्दी जमली. शिक्षणाधिकाऱ्यांना काम सांगून बरेच दिवस झाले पण त्यांनी टाळाटाळ केल्याचे प्रशांत कडते यांनी सांगितले. याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप केला. कडते यांना शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनात नेऊन चर्चा केली. शिक्षणाधिकारी जगताप यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यावर अध्यक्ष वैद्य यांनी नियमानुसार त्यांच्या मागणीवर कार्यवाही करावी अशी सूचना करीत कडते यांना आल्या पावली परत नेले. अध्यक्ष वैद्य यांनी सदस्यांनी आपली कामे माझ्याकडे देणे अपेक्षित आहे. मी सदस्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी सक्षम आहे. सदस्यांनी नियमानुसार कामांचा आग्रह धरावा, अशी प्रतिक्रिया दिली.
याबाबत शिक्षण अधिकारी जगताप यांना विचारले असता कडते यांनी सांगितलेल्या कामांमध्ये त्रुटी आहेत. काहीवेळा वादग्रस्त शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना मान्यता देताना संबंधित शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कोण आहेत? हे स्पष्ट होण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून उतारा आणण्याबाबत त्यांना सुचित केले जाते. या प्रकरणात कडते यांना असे पत्र आणण्याबाबत सांगितले होते. तरीही त्यांनी ते पत्र न आणता अशा पद्धतीने ठिय्या मारला. मी कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही, असे स्पष्ट केले.
दुसरी घटना…
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याने माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातला होता. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता दुसऱ्यांदा झेडपी सदस्याने असा प्रकार केल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.



