गणेश मूर्ती विक्रीतून सोलापूर उमेदची १.६५ कोटींची ऐतिहासिक उलाढाल

सोलापूर : ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांचे काम अत्यंत उल्लेखनीय असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच ‘उमेद’ अभियानाचे मुख्य ध्येय आहे. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी व्यक्त केले.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नुकताच ‘गणेशोत्सव व गौरी गणपती महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तब्बल १ कोटी ६५ लाख १८ हजार ७६३ रुपयांची बंपर उलाढाल करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या ५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी ५५,७६४ गणेशमूर्तीं खरेदी करून महिला बचत गटांच्या मूर्तींना पसंती दिली. सदरचे स्टॉल हे सर्व पंचायत समित्या, बस स्थानके, सर्व गावात आणि मुख्य गर्दीच्या ठिकाणी एकूण १६३ विक्री केंद्रे आणि स्टॉल्स उभारण्यात आले होते.ठोक आणि किरकोळ विक्रीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप म्हणाले की,दिनांक ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या महोत्सवात केवळ किरकोळच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात (ठोक स्वरूपात) गणेशमूर्ती आणि इतर साहित्याची विक्री झाली. सोलापूर शहरातील नागरिक, जिल्ह्यातील ग्राहक आणि प्रभाग संघाच्या सदस्यांनी या स्टॉल्सला भेट देऊन खरेदीला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये माळशिरस तालुक्याने सर्वाधिक ६४ लाख ८५ हजार रुपयांची कमाई करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर करमाळा आणि मोहोळ तालुक्यांनीही २० लाखांपेक्षा जास्त उलाढाल केली आहे.या महोत्सवात केवळ पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच नव्हे, तर महिलांनी स्वतः तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, मकर, आरास साहित्य, हस्तकलेच्या वस्तू आणि आकर्षक हार यांची विक्री करण्यात आली. ग्रामीण भागातील दीदींना ‘लखपती दीदी’ करण्यासाठी उमेद अभियानामधून सोलापूर जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक शैला केशवदास, गणेश पाटील, सुषमा बिचकुले, अवधूत देशमुख, उमेश डांगे, रणजीत शेंडे, उमेश जाधव, कृणाल पाटील, आण्णा आवताडे, पूनम दुध्याळ, शिवाजी वाघमारे, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
तालुकानिहाय विक्री अहवाल
:माळशिरस: २१ स्टॉल्स | ८,९८२ मूर्ती विक्री ₹६४,८५,०००/- मोहोळ: १२ स्टॉल्स | ६,२२२ मूर्ती विक्री ₹२२,६४,०८८करमाळा: ३९ स्टॉल्स | ७,५३० मूर्ती विक्री |₹१९,११,१८५ दक्षिण सोलापूर: ४ स्टॉल्स | ६,००० मूर्ती विक्री ₹१२,६०,००० उत्तर सोलापूर: १० स्टॉल्स | २,०८५ मूर्ती विक्री ₹६,९१,७७० सांगोला: १६ स्टॉल्स | ६,४३८ मूर्ती विक्री ₹८,८७,१४० माढा: १८ स्टॉल्स २,८५० मूर्ती विक्री ₹६,१७,२००अक्कलकोट: ६ स्टॉल्स | २,६८९ मूर्ती विक्री ₹६,०७,५३०मंगळवेढा: ४ स्टॉल्स | १,०७३ मूर्ती विक्री ₹६,००,८८०बार्शी: १५ स्टॉल्स | ७,५५८ मूर्ती विक्री ₹५,६५,०००पंढरपूर: १८ स्टॉल्स | ४,३३७ मूर्ती विक्री ₹३,५८,९७०
एकूण सोलापूर जिल्हा: १६३ स्टॉल्स | ५५,७६४ मूर्ती विक्री | एकूण विक्री: ₹१,६५,१८,७६३
उमेद अभियान अंतर्गत महिलांच्या शाश्वत उपजिविका निर्माण करण्यासाठी वेगवेगळे महोत्सव आयोजित करून त्यांना मार्केटिंगचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद सोलापूर



