
सोलापूर : घरातील विश्वासू नोकरानेच मालकिणीच्या सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेड्डी यांनी आरोपी राजू हणमंतु भंडारे याला दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे.
*शिक्षा अशी :*
*BNS कलम 74* – ३ वर्षे सश्रम कारावास व १,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना कारावास)
*BNS कलम 75* – २ वर्षे सश्रम कारावास व १,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना कारावास)
*घटनेचा तपशील :* दि. 26/08/2025 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास पीडित महिला घरातील कामे संपवून स्वयंपाक घरात जेवण घेत असताना, आरोपी नोकर राजू भंडारे हा गेट बंद करण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात आला आणि त्याने पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने जाब विचारला असता आरोपीने “चुकून हात लागला” असे सांगितले. त्यानंतर आरोपी पुन्हा स्वयंपाक घराच्या पाठीमागील गेटचे कुलूप लावून आत आला, एकेरी भाषेत बोलून अश्लील व लज्जास्पद भाषेत पीडितेजवळ येऊन शारीरिक सुखाची मागणी केली व पुन्हा विनयभंग केला. पीडितेने उपचार घेऊन सदर बझार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी BNS कलम 74, 75(2), 79 प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासांती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
*न्यायालयीन कामकाज :*
सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित महिला, तिची सासू आणि शेजारी व्यक्तींनी घटनेप्रमाणे सुसंगत साक्ष दिली. पीडित महिला ही एका प्रतिष्ठित घराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीची सून असून, आरोपी हा घरातील विश्वासू नोकर असतानाही त्याने विश्वासघात करून विनयभंग केल्याने जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. डॉ. प्रदिपसिंह राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीच्यावतीने ॲड. महेश सोलनकर यांनी काम पाहिले.



