
सोलापूर : कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी ८,५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गिरीशचंद्र सुलतानराव वाघमारे (तत्कालीन वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद, सोलापूर, रा. १००, नालंदानगर, विजापूर रोड, सोलापूर) याला दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
जिल्हा न्यायाधीश-३, सोलापूर डी. एस. गुजराथी यांच्या न्यायालयाने दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार ही शिक्षा सुनावण्यात आली.
*प्रकरणाचा तपशील :*
तक्रारदार यांच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे तक्रार दिली असता, पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले होते. याप्रकरणी सोलापूरातील सदर बझार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
*न्यायालयीन कामकाज :*
सरकार पक्षातर्फे सुरेश पाटील-कुलकर्णी यांनी काम पाहिले. तत्कालीन पोलीस अधीक्षक सारंग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे व अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक छाया मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून मधुकर शिंदे यांनी काम पाहिले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंदर्भात काही माहिती असल्यास किंवा लाच मागितल्यास *टोल फ्री क्रमांक १०६४* किंवा दूरध्वनी *०२१७-२३१२६५८* व व्हॉट्सॲप *९९३०९९०७५* वर संपर्क साधावा. तसेच *dyspacbsolapur@gmail.com* या ईमेलवर किंवा *www.acbmaharashtra.net* या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.



