सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

पीक नुकसानीचे पंचनामे सरसकट व अचूक करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, कोरड्या पडलेल्या विहिरी तसेच जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ व अचूक नोंद घेण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचोळी आणि शिरसी या गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोरड्या पडलेल्या विहिरी, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि चाऱ्याची उपलब्धता याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

लेंडवे चिंचोळी येथे टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. टँकरमधून नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे किंवा नाही, याची माहिती घेतली. तसेच पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे किंवा नाही, याचीही त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना नियोजित वेळेनुसार व आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील वाकी(घेरडी), बुरलेवाडी, वाडेगाव, वाणीचिंचोळी आणि राजापूर या गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, विहिरींची पाणीपातळी, जनावरांसाठी उपलब्ध चारा तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच दोन्ही तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सरसकट करण्यात येत असल्याचे सांगितले. निर्धारित कालावधीत पंचनाम्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार बाळूबाई भागवत, मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, संबंधित मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच संबंधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*शेतकऱ्यांशी संवाद व त्यांच्या मागण्या*

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रशासनामार्फत वेळेत प्रस्ताव सादर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी केली. तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन व जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करावे. चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास चाऱ्यासाठीचे अनुदानही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उपलब्ध करून द्यावे. चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याऐवजी थेट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button