
अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे आळगी ता. अक्कलकोट येथील शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतातून १ कोटी ०५ लाख ५९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दि. २८/०९/२०२६ रोजी सपोनि प्रशांत बधे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे आळगी येथे शेतकरी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृश वनस्पतीची लागवड केली आहे.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वरिष्ठांना कळवून कारवाईचे आदेश घेतले. आरोपी नामे मल्लप्पा गुरबप्पा गठी उर्फ बिराजदार वय ६० वर्षे रा. शेगाव ता. अक्कलकोट याच्या शेताची पाहणी केली असता, ऊसामध्ये १२ फूट उंचीची मोठी गांजासदृश झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. पंचनामा करून जप्त केले असता २४० गांजाची झाडे मिळून आली, पैकी २१० जिवंत व ३० वाळलेली झाडे होती. त्याचे वजन केले असता २९९ किलो ९०० ग्रॅम वजनाचे आढळून आले. त्याची किंमत १ कोटी ०५ लाख ५९ हजार रुपये आहे.
याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रशांत बधे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक कुलकर्णी, अपर अधीक्षक कबाडे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.



