सोलापुरात कलेक्टर कार्यालयासमोर स्कूटर हवेत उडून दोन मुले जखमी
नवे गतिरोधक ठरतायेत धोकादायक
सोलापूर : सोलापुरात कलेक्टर कार्यालयासमोर नव्याने करण्यात आलेले गतिरोधक धोक्याचे ठरत आहेत. गुरुवारी पहाटे स्कूटर हवेत उडून दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. येथून जाणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात हे गतिरोधक येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत.
सोलापुरातील नवीन कलेक्टर कार्यालयासमोर नव्याने गतिरोधक करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत हा रस्ता मोकळा असल्यामुळे वाहन चालकांना सवय झाली आहे. पण नव्याने केलेले गतिरोधक वाहनचालकाच्या लक्षात येत नसल्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे. रात्री हे गतिरोधक दिसत नाहीत. पत्रकार भवन चौकात गतिरोधकावर दुचाकीवरून पडून एक शिक्षिका ठार झाल्याची घटना ताजीच असताना शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सातरस्ता चौकाकडून विजापूर नाक्याकडे निघालेली स्कूटी येथील गतिरोधकावरून हवेत उडाली. या स्कुटीवर स्वार असलेल्या मुलांना हा गतिरोधक लक्षात आला नाही. वेगाने आलेली स्कूटर गतिरोकावरून हवेत उडाली. चालकाचा ताबा सुटल्याने ते दोघेही रस्त्यावर फेकले गेले. स्कूटर रस्त्यावरून घसरत गेल्यामुळे मोठा आवाज झाला. स्कूटर चालवणाऱ्या मुलाचे डोके रस्त्यावर आढळल्मुळे खोक पडली. सुदैवाने यावेळी या मार्गावरून रिक्षा व काही मोटरसायकलस्वार जात होते. त्यांनी हा अपघात पाहिला व त्या मुलांना तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातातील जखमीला मदत करत असतानाच सात रस्त्याकडून वेगाने कार आली व तीही या गतीरोधकावर आढळली. चालकाने स्वयंशीलता दाखवत गाडीचा वेग कंट्रोल केला. कलेक्टर कार्यालयासमोर नव्याने करण्यात आलेल्या या गतीरोधकामुळे अनेक अपघात झाल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले. तयार करताना त्यावर पांढरे पट्टे मारणे गरजेचे होते. रात्रीच्या वेळी चालताना हे गतिरोधक लक्षात येत नाहीत. कलेक्टर कार्यालयासमोरच बांधकाम विभागाने केलेला हात गतिरोधक धोकादायक बनल्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेन यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षाचे उपाययोजना करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.



