सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपी आरोग्य विभागाची “तारीख पे तारीख’

फार्मासिस्ट नियुक्ती, चष्मे खरेदी चौकशी रखडली

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चौकशी प्रकरणात “तारीख पे तारीख’ देत गंभीर प्रकरणांना बगल देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले आहे.

आषाढी यात्रेच्या वेळेस जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने वारकऱ्यांना मोफत चष्मे वाटपाचा उपक्रम राबवला होता. यासाठी काढण्यात आलेले टेंडर वादाच्या भवऱ्यात अडकले आहे. आषाढी यात्रा 24 जुलै रोजी असताना 23 जुलै रोजी चष्मे वाटपाचे वर्कऑर्डर देण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते. याबाबत गाजावाजा झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या प्रकरणाची चौकशी लावली. या चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांना नेमण्यात आले आहे. मोठा कालावधी लोटला तरी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही. समितीचे अध्यक्ष डॉक्टर कोपूरवाड यांनी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले होते. पण एक ऑक्टोबर रोजी याबाबत त्यांना विचारले असता आज चौकशी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेला आठवडा लोटला तरी पण चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेलेला नाही.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य औषध भांडाराचे फार्मशिष्ट प्रवीण सोळंकी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवा जेष्ठता डावलून त्यांच्या जागी लीना पुजारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती मिळवण्यासाठी फार्मासिस्ट पुजारी यांनी यापूर्वी मुख्यालयात काम केल्याचा अनुभव असल्याचे म्हटले आहे. मुख्यालयात काम केलेले नसतानाही असा खोटा अहवाल देऊन त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचे दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. याबाबत छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पत्रही आरोग्य विभागात दडवून ठेवण्यात आले होते. पत्र दडवून ठेवणारे व फार्मासिस्ट पुजारी यांची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्याकडे आहे. औषध खरेदीमध्ये गडबड होऊ लागल्यावर या प्रकरणात आरोग्य समितीत ही गंभीर चर्चा झाली होती. आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी फार्मासिस्ट पुजारी यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार फार्मासिस्ट पुजारी यांना दोन वेळा नोटीसा बजावण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कोपूरवाड यांनी सांगितले. या दोन्ही गंभीर प्रकरणात फक्त कागदी घोडे नाचविले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून फक्त “तारीख पे तारीख’ असा खेळ सुरू असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य सभापतींनी आदेश देऊनही कारवाईस चालढकल होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button