सोलापूरच्या या झेडपी शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तयारी सुरू
दक्षिण सोलापूर तालुक्यात चौथी व सातवी शिष्यवृत्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त सुरुवात

मंद्रूप-कुंभारी : पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२७ च्या तयारीसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता चौथीच्या शिक्षकांसाठी लोकसेवा हायस्कूल, मंद्रूप येथे, तर इयत्ता सातवीच्या शिक्षकांसाठी मार्कंडेय हायस्कूल, कुंभारी येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. मंद्रूप पगार बीटअंतर्गत सहा केंद्रांतील चौथीचे शिक्षक उपस्थित होते.
या कार्यशाळेस गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, विद्यार्थ्यांची योग्य तयारी, नियमित सराव, प्रश्नपत्रिका सोडविण्याची पद्धत तसेच आत्मविश्वास निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र व्हावेत, हा प्रमुख उद्देश असून मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता व शंका समाधान या घटकांवर तज्ज्ञ शिक्षकांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.या उपक्रमामुळे शिक्षकांना प्रभावी अध्यापन पद्धतीची दिशा मिळत असून दक्षिण सोलापूरचा शिष्यवृत्ती निकाल उंचावण्यास मदत होणार आहे.



