सोलापूरक्राईममहाराष्ट्र

सोलापूर झेडपीच्या माजी चालकाने केली मुलीची हत्या

साताऱ्यातील शिरवळ-राजेवाडी मार्गावरील अनोळखी मृतदेहाची उकल

सातारा : सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या दोन महिलांपैकी एका हत्येचा पर्दाफाश झाल्यानंतर दुसऱ्या घटनेचीही उकल स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. यात बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याचे उघड झाले असून हा बाप सोलापूर जिल्हा परिषदेत चालक म्हणून सेवेत होता व निवृत्तीनंतर तो पुण्यात स्थायिक झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ-राजेवाडी मार्गावर १४ सप्टेंबर रोजी एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला होता. शिरवळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद होती. हा मृतदेह पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील जांभुळवाडी येथील हर्षदा हणमंत जाधव (वय १९) हिचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्षदा ही घरात शिवीगाळ करणे, व्यसन करणे आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असल्याने तिच्या त्रासाला कंटाळून वडील हणमंत दामोदर जाधव (रा. आंबेगाव खुर्द, ता. हवेली) आणि चुलत चुलता बाळू अंकुश जाधव (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तिला हॉटेलला जेवायला जाण्याच्या बहाण्याने गाडीतून नेले आणि तोंड-नाक दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे. सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे नात्यातील हर्षदा हिला लहानपणीच त्याने दत्तक घेतले होते. पण ती मोठी झाल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली.

सातारा पोलिसांनी घटनास्थळापासून पुणे-भोर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. दोन्ही संशयितांना अटक करून शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस पुढील तपास करीत आहे. यातील आरोपी हनुमंत हा सोलापूर जिल्हा परिषदेत चालक म्हणून सेवेत होता. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, प्रशासन व अतिरिक्त उच्च कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर त्याने काम केले आहे. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर तो पुणे येथे स्थायिक झाला होता. या गुन्ह्यात त्याचे नाव पुढे आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button