सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

निवृत्तीवेतनधारकांना ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे आता मोबाईलवरच सेवा

सोलापूरात जिल्हा कोषागराच्या कार्यशाळेत ८०० जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा व माहिती अधिक सुलभपणे आणि डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या *’Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी)* मोबाईल अॅपबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत लेखा व कोषागारे विभागाच्या सचिव रिचा बागला तसेच संचालक, लेखा व कोषागारे दीपा देशपांडे यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. ‘महा-उपलब्धी’ अॅप हे निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी असून, निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा व आवश्यक माहिती मोबाईलवरून सहज उपलब्ध करून देणे हा या अॅपचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅपच्या विविध सुविधांची माहिती, त्याचा वापर करण्याची पद्धत तसेच डिजिटल माध्यमातून सेवा प्राप्त करण्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असल्याने कार्यशाळेचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक सत्रात सुमारे ४०० निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांनी अॅपच्या वापराबाबत उत्सुकतेने माहिती घेतली तसेच विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील विविध निवृत्तीवेतनधारक संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. महा-उपलब्धी अॅप तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेबाबत संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. निवृत्तीवेतनविषयक सेवा डिजिटल माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निवृत्तीवेतनधारकांसाठी सोयीचा असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत यांनी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना आवाहन केले की, तांत्रिक अडचणीमुळे किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसल्यामुळे एखाद्या निवृत्तीवेतनधारकास ‘महा-उपलब्धी’ अॅपवर नोंदणी करता आली नाही, तरी त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित कोणतीही सेवा बंद होणार नाही किंवा त्यावर परिणाम होणार नाही. निवृत्तीवेतनविषयक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे अॅपवर नोंदणी न झाल्याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच निवृत्तीवेतनासंदर्भात अनधिकृत स्रोतांकडून अथवा अप्रमाणित माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालय किंवा तालुका उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कोषागार कार्यालयातील परिविक्षाधीन सहायक संचालक रोहन जाधव, परिविक्षाधीन सहायक संचालक नितीन कांबळे, अपर कोषागार अधिकारी रणजीत कदम, रामकृष्ण डंके, निलेश साखरे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग, विविध निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि त्यांच्याकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यशाळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. ‘महा-उपलब्धी’ अॅप हे निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी असून, डिजिटल माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button