
बार्शी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे आज थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. बार्शी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई व पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बार्शी पंचायत समितीला भेट दिली.
सेवा संकल्प अभियानांतर्गत आढावा: पंचायत समितीत झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलजीवन मिशनची कामे, घरकुल योजना आणि समृद्ध पंचायत राज अभियानाचा सविस्तर आढावा घेतला. टंचाईच्या काळात नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
बांधावर जाऊन पाहणी
यानंतर त्यांनी उपळाई ठोंगे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. दुष्काळासाठी शासन उपायोजना करत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असा धीर त्यांनी दिला. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील उत्कृष्ट परसबागेची पाहणी, महिला बचतगटाच्या उद्योगांची माहिती, पानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करत ओपीडी वाढवण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, सभापती मीनाक्षी रोंगे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.



