सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयसण- उत्सव

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतले अनाथ बालकांसमवेत भोजन

सरकारी बंगल्यातील भोजनाने बालके तृप्त 

सोलापूर – छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनाथ मुला- मुलींना घरी बसविलेल्या गणरायाचे दर्शन घडवित ऐतिहासिक असलेल्या प्रशस्त शासकीय निवासस्थानात बालकांसमवेत भोजन घेत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात यांनी त्याच्या निवासस्थानी जय किशन शिक्षण संस्था संचलित भगवान बाबा बालिकाश्रम व योगेश्वरी बालकाश्रम येथील बालकांना महाआरती व महाप्रसादासाठी बोलावले होते. अनाथ मुलांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने छत्रपती संभाजीनगर च्या जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान दुमदुमून गेले. अनाथ मुलांनी आनंदाने गणरायाची आरती केली.

सोमवारी दुपारी ही मुले जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी आली होती. श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने या मुलांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते.  ही मुले अंगात लाल व भगव्या रंगाचे सदरे घालून मोठया शिस्तीने टेबल खुर्चीवर येऊन बसली. त्यांच्यासाठी आज पंचपक्वांनांचा थाट होता. भिरभिरत्या नजरेच्या मुलांनी जेवायला सुरूवात केली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी पुढे सरसावत मुलांना जेऊ घातले. स्वतःच एकेक पदार्थ घेऊन मायेने त्यांना आग्रह करून वाढू लागले. जिल्हाधिकारी स्वामी व त्यांच्या पत्नी करूणा स्वामी यांनी मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. या ठिकाणी उपस्थित प्रशिक्षणार्थी आयएएस यांनी देखील मुलांसमवेत महाप्रसाद घेतला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी मुला मुलींना हाताने भरविले. गरम गरम चपाती, बेसन गोळ्याची आमटी, पुलाव, गुलाबजामून, तवा पनीरची भाजी, कचोरी, पाणी पुरी असा खास बेत या अनाथ बालकांसाठी केला होता. करूणा स्वामी यांनी सर्व मुलांना मायेने भोजन देऊन आदरातिथ्य केले. सोलापूरहून म्हाडाच्या वित्त विभागाचे उपसंचालक अजयसिंह पवार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, ठेकेदार प्रल्हाद काशीद, सोलापूर झेडपीच्या  स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, पालघरचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी उपस्थित होते. समन्वयक म्हणून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक दिपक मोरे यांनी नेटके नियोजन केले होते.संस्थेतील बालकासोबत कर्मचारी व संचालिका कविता वाघ-घुगे, व्यवस्थापक नितीन घुगे, अधीक्षिका योगीता बाविस्कर, बाल कल्याण अधिकारी विजय मगरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button