सोलापूर

बालाजी, प्रीसिजनच्या माध्यमातून अंबिकानगर झेडपी शाळेचे पालटले रूपडे

सीसीकॅमेरा, वाय-फाय, संगणक प्रशिक्षण ते स्वच्छतागृहाची झाली चांगली सोय

  1. सोलापूर : सामाजिक दायित्व म्हणून कंपनीमार्फत काम करत असताना उदात्त हेतू ठेवलेला असतो. या फंडातून शाळेच्या केलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा हा हेतू असतो. शिक्षक व पालकांनी या सर्व सुविधांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा असे आवाहन प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.

  2. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंबिका नगर (बाळे) तालुका उत्तर सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापूर येथील प्रिसीजन फाऊंडेशन व बालाजी अमाईन्स यांच्या सीएसआर फंडातून व लोकसहभागातून शाळेत करण्यात आलेल्या विविध कामांच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी हे उपस्थित होते. प्रिसीजन फौंडेशनच्यावतीने सोलर सिस्टीम, इ – लर्निग सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मैदानावर पेव्हर ब्लॉक, फरशीकरण, किचन शेड व इतर कामे केली आहेत. त्याचप्रमाणे बैठक स्कूल, पासवर्ड, आविष्कार व नाट्य अभिनय प्रशिक्षण आदी प्रकल्प ही शाळेत सुरू करण्यात आले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी चांगलाच फायदा होत आहे. बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून मुलींसाठी व मुलांसाठी उत्तम दर्जाचे स्वच्छतागृह बांधून देण्यात आले आहे. शिक्षकांच्या सहभागातून रंगरंगोटी, छोटी बाग, वायफाय सुविधा व शाळेचे सुशोभीकरण करून घेण्यात आले आहे. लोकसहभागातून डॉ. अविनाश राऊत यांच्यावतीने शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व सुविधा विद्यार्थी केंद्रित आहेत. अशा सर्व सुविधा पुरविणारी तालुक्यातील पहिली शाळा आहे. या सर्व सुविधा परिसरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
    प्रारंभी सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सुहासिनी शहा, प्रसाद मिरकले व मल्लिनाथ बिराजदार यांच्या हस्ते लोकार्पण फलक व सर्व सुविधा यांचे उद्घाटन करण्यात आले.
    यावेळी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी आपल्या मनोगतात शाळेत झालेल्या सकारात्मक बदलाबद्दल कौतुक केले. सीएसआरच्या माध्यमातून समाज आणि शिक्षक यांच्या सुसंवाद मधून शाळेचा विकास साधला आहे, याचे सर्वानी अनुकरण करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
    मल्लिनाथ बिराजदार व
    सिद्धेश्वर निंबर्गी यांनी आपल्या मनोगतात शाळेने केलेल्या कामाचे कौतुक केले.
    या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मी कनकधर, उपाध्यक्ष कल्पना अडगळे, सर फौंडेशन महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, प्रज्ञा  राऊत, केंद्रप्रमुख गुंडीबा हरगुडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका  रंजना काटकर, वैशाली गोंदकर, तेजश्री ढगारे, रसिका बंदीछोडे, शिक्षक शिवशंकर राठोड व शिवाजी वडते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे यांनी केले. या कार्यक्रमास विठ्ठलसिंह राजपूत, सीव्ही बिराजदार, तालुक्यातील केंद्रप्रमुख, विविध शाळेचे मुख्याध्यापक व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button