सोलापूर झेडपीतील “हे’ कर्मचारी आज काळ्याफिती लावून कामकाज करणार
चंद्रपूर झेडपीच्या कॅफोच्या निषेधार्थ उचलले पाऊल

सोलापूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त कामकाजाचे निषेधार्थ सोलापूर जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कर्मचारी सोमवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी काळी फित लाऊन काम करणार आहेत.
जिल्हा परिषद चंद्रपूर येथील CAFO अतुल गायकवाड यांच्या वादग्रस्त कामाच्याशैली विरोधात लेखा कर्मचारी संघटनेने दिनांक 28 सप्टेंबर रोजी एक दिवस निषेध म्हणून काळया फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 5 सप्टेंबर रोजी सोलापुरात झालेल्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा निषेधाचा ठराव घेण्यात आला होता. लेखा कर्मचारी यांच्या वारंवार बदल्या करणे, कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मागील तीन वर्षापासून लेखा कर्मचारी यांचे CR न लिहिणे, महिला व दिव्यांग कर्मचारी यांना त्रास देणे, धमकावणे, कर्मचारी यांच्या तक्रारीमुळे त्यांची बदली झाली होती ती MAT मध्ये जाऊन रद्द केली. अशा अनेक कारणामुळे तेथील कर्मचारी त्रस्त असल्याने महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष श्री मिलिंद दादा कांबळे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये उद्या अतुल गायकवाड यांच्या निषेधार्थ काळया फिती लावून कामकाज केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना देण्यात आले आहे. तसेच श्री सूर्यकांत भुजबळ व मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांना ही निवेदन देऊन अवगत केले आहे. अतुलकुमार गायकवाड यांचे निलंबन करावे व त्यांना यापुढे जिल्हा परिषद कडील नियुक्ती देऊ नये अशी संघटनेची मागणी आहे.
लेखा विभागातील कर्मचारी हे जिल्हा परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या कामकाजावर जिल्हा परिषदेच्या आर्थिक शिस्तीचा व दैनंदिन प्रशासकीय व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी व अनेक प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक व समन्वयात्मक पद्धतीने निराकरण करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन सोलापूर शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद जाधव व राज्य उपाध्यक्ष उमाकांत राजगुरु यांनी केले आहे. त्यामुळे दिनांक 28 सप्टेंबर रोजी लेखा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या काळी फीत आंदोलन करण्यात येणार आहे. तरी प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन लेखा कर्मचारी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन चंद्रपूर कॅफोवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद जाधव यांनी केले आहे.



