ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत शासकीय सेवेत रुजू झालेल्या काजल कांबळे यांच्या घरी दीप प्रज्वलन
सेवा संकल्प अभियान -समाज कल्याण विभागाचा संवेदनशील उपक्रम,

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सोलापूर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह दक्षिण व उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये शासकीय सेवेचा लाभ मिळालेल्या लाभार्थी महिला कर्मचारी काजल कांबळे यांच्या निवासस्थानी दीप प्रज्वलन करण्यात आले.
काजल कांबळे यांना अॅाट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार पुनर्वसनाचा भाग म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, दक्षिण सोलापूर येथे शिपाई पदावर शासकीय नोकरी देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे एका पीडित कुटुंबाला पुन्हा सन्मानाने जगण्याचे बळ मिळाले आहे.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना काजल कांबळे म्हणाल्या, “आमच्या कुटुंबावर अचानक मोठा आघात झाला होता. मात्र, सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाने तत्परतेने घेतलेल्या निर्णयामुळे मला शासकीय सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली. या आर्थिक आधारामुळे माझे आणि माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित व उज्ज्वल झाले आहे. या संवेदनशील मदतीबद्दल मी शासनाचे आणि समाज कल्याण विभागाचे मनापासून आभार मानते.”
या कार्यक्रमादरम्यान समाज कल्याण सहा. आयुक्त सुलोचना सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली विभागाचे अधिकारी गृहपाल सुरेश काळे व गृहपाल अवण्णा कोळी हे या उपक्रमात सहभागी झाले होते.यावेळी कांबळे, कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कांबळे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शासनाच्या योजना व सहाय्य तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी नमूद केले.



