मंद्रूपच्या झेडपी शाळेत आणून ठेवले शौचालय; वापरणार कधी? न्यायाधीशांचा सवाल
विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; कारकल झेडपी शाळेवरील विजेच्या तारा काढण्याची सूचना

सोलापूर : उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या जनहित याचिका क्र. १/२०१८ अंतर्गत जिल्हास्तरावर गठित करण्यात आलेल्या तपासणी समितीने बुधवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना अचानक भेटी देत शाळांमधील विविध सुविधांची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सविस्तर तपासणी केली.
समितीने मंद्रूप मराठी मुले, मंद्रूप मराठी मुली, मंद्रूप उर्दू, कारकल, औज (मंद्रूप) आणि वडकबाळ या सहा शाळांना भेट देऊन शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, भौतिक सुविधा, विद्यार्थी लाभाच्या योजना, अध्यापन, विद्यार्थी सुरक्षा तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी यांचा आढावा घेतला.
कारकल येथील जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, संगणक शिक्षण, विद्यार्थ्यांची शिस्त, स्काऊट-गाईड उपक्रम, शिक्षकांच्या योगदानातून करण्यात आलेली शाळेची रंगरंगोटी, शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी, दोरीवरील मल्लखांब तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची समितीने विशेष दखल घेत कौतुक केले. शाळा तपासणीदरम्यान काही ठिकाणी धोकादायक विद्युत तारा, धोकादायक वर्गखोल्या, व्हरांड्यातील निघालेले प्लास्टर, स्वच्छतागृहांची दुरवस्था तसेच शाळा परिसरातील धोकादायक खड्डे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बाबींची तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती व कार्यवाही करण्याचे निर्देश समितीने संबंधित प्रशासन व मुख्याध्यापकांना दिले.
काही शाळांमध्ये शिक्षकांच्या उपलब्धतेबाबतही आढावा घेण्यात आला. औज (मंद्रूप) येथील शाळेत एका शिक्षकाच्या महिनाभराच्या रजेच्या पार्श्वभूमीवर एका शिक्षकावरच शाळेचे कामकाज सुरू असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मंद्रूप येथील शाळेत परिपाठाचे निरीक्षण करण्यात आले. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश समितीने दिले. खराब झालेला सोयाबीन नष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शाळा परिसरातील तयार स्वच्छतागृह आठ महिन्यांपासून वापरात नसल्याचे तसेच ते इन्स्टॉल न केल्यामुळे पडून असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश स्टेशनची कमतरता आढळून आली. तसेच कचरा टाकण्यासाठी शाळेच्या आवारात खोदण्यात आलेला धोकादायक खड्डाही निदर्शनास आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बाबी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.मंद्रूप शाळा समूहातील तीनही शाळांमध्ये परिपाठ, प्रार्थना आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे निरीक्षण करून समितीने समाधान व्यक्त केले.
वडकबाळ जिल्हा परिषद शाळेतील स्वयंपाकगृहाकडे जाणाऱ्या भागाबाबत सुरक्षिततेची दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच मंद्रूप, औज व वडकबाळ शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समित्या आणि तक्रार पेटीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तपासणीदरम्यान समितीच्या सदस्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नायब तहसीलदार जयश्री पंचे आणि पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पवार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत पोक्सो कायदा, विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षित वर्तन याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि पोषक शैक्षणिक वातावरण मिळणे ही शाळा प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असून, सुरक्षेशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित करू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये अध्यक्ष तथा माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार जयश्री पंचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश रजपूत यांचे प्रतिनिधी अधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष हुंबे यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांचे प्रतिनिधी बापूराव जमादार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे प्रतिनिधी अनिल जगताप, दक्षिण सोलापूरचे विस्तार अधिकारी गुरुबाळ सणके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



