चंद्रपूरच्या कॅफोला सोलापूरसह 27 जिल्ह्यातून विरोध
लेखाधिकारी कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला सर्वच कर्मचारी संघटनांचा पाठिंबा

सोलापूर: महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांनी केलेल्या आवाहनानुसार चंद्रपुर जिल्हा परिषदेचे CAFO अतुल गायकवाड यांच्या वादग्रस्त कार्यशैली विरोधात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व लेखा कर्मचारी यांनी सोमवारी काळया फिती लावून कामकाज केले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारे त्रास देणे सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या विरोधावरून त्यांची बदली झाली होती पण मेट मधून परत येऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभर प्रतिक्रिया उमटले आहेत. राज्य लेखाधिकारी कर्मचारी संघटनेच्या अहवालानुसार सोमवारी राज्यातील 27 जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून त्यांच्या कामकाजाचा निषेध केला व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील 90 कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. लेखाधिकारी कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला सर्वच कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. कर्मचारी संघटनांचा विजय असो अशा घोषणा देत लेखा विभागातील कर्मचारी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या इमारती समोर जमा झाले व आपली एकजूट दाखवली. सोलापूरच्या कर्मचाऱ्यांची एकजूट राज्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची यात भूमिका महत्त्वाची आहे.



