सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीच्या अधिकाऱ्यांची एक रात्र गावासाठी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री एक दिवस गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानाअंतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान व वृक्षारोपनाची मोहिम राबविन्यात आली. सिईओ कुलदीप जंगम यांनी स्वतः शिरवळ (ता. अक्कलकोट) येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात सहभाग नोंदविला.

कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच आयएएस अधिकारी मुक्कामासाठी आल्याने ग्रामस्थ भारावून गेले. जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांनी देखील या मोहिमेसाठी गावात मुक्काम करून महास्वच्छता अभियानअंतर्गत श्रमदान करून व्यापक जन चळवळ राबविली.

पहाटे सिईओ वृक्षारोपनासाठी बांधावर 
अक्कलकोट तालुक्यात शिरवळ येथे मुक्कामी असलेले सिईओ कुलदीप जंगम भल्या पहाटे उठून बांधावर जाऊन ग्रामस्थासमवेत वृक्षारोपण केले.
रात्री मुक्कामास आल्यानंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी भारतीय बैठक मारून ग्रामस्थांशी संवाद साधला. सिईओ यांची घोंगडी बैठकीमुळे ग्रामस्थांनी आपल्या  भावना व्यक्त करून गावातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. ग्रामस्थांनी कानडी व मराठीत भजन केले. भजनात सिईओ जंगम हेही तल्लीन झाले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी या मोहिमेचे नियोजन केले.

दुःख विसरून वृक्षारोपणासाठी हात 
शिरवळमध्ये एका व्यक्तीचे निधन झाल्यामुळे श्रमदान मोहिम घेता आली नाही. मात्र सिईओ समवेत १ हजार वृक्ष लागवड मोहिमेत ग्रामस्थ दुःख विसरून सहभागी झाले.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतून राबविली जात असलेली मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविन्यासाठी सिईओ कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी शिरवळ येथे तर अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे मुक्काम केला. ग्रामसभा घेऊन लोकांना अभियानाची माहिती दिली. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुक्काम करून पहाटे महाश्रमदानात सहभाग नोंदवला. कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी कामती येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी कमलापूर येथे तर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी माचणूर येथे तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकलेयांनी बार्शीतील पाथरी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी हे कुंभारी तर कृषी अधिकारी एच एस हावळे टेंभुर्णी, शिक्षणाधिकारी कादर शेख हे ब्रम्हपुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांनी यशवंतनगर येथे मुक्काम केला.

महा श्रमदानासाठी सरसावले हात

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामस्थांनी महाश्रमदानात भाग घेतला. शाळकरी मुलांच्या प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. सर्व गावांत हजारो हात श्रमदानासाठी सरसावले होते. प्लास्टिक विलगीकरणाबरोबर अनेक सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करन्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button