सोलापूरशिक्षणसंघटना-संस्था

सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाईची सकल मराठा समाजाची मागणी 

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना होत असलेल्या कथित त्रासाच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना दिलेल्या निवेदनात, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे गेली दोन वर्षे सोलापूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असून उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा संचलित इंग्लिश स्कूल, वेळापूर येथील एका शिक्षिकेच्या २०१६ मधील नियुक्तीला तब्बल दहा वर्षांनंतर मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

राज्यात शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असून सर्वोच्च न्यायालयाचेही त्यासंदर्भातील आदेश आहेत. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी नियमाप्रमाणे टीईटीची अट घालून वेतनश्रेणी मान्यता दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असे असताना संबंधित शिक्षिकेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वारंवार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दि. ११ मे २०२६ रोजी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत येऊन दबाव टाकणाऱ्या या संबंधित व्यक्तीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माऊली पवार,सचिन जगताप-अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड,महेश पवार,राजेश शेळके,सचिन पवार यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button