सोलापूरजिल्हा परिषद

Wari: किशोरवयीन मुलींचा वाढतोय सहभाग; हिरकणी कक्षाची कक्षा आणखी वाढविणार

सोलापूर : आषाढी वारीमध्ये महिलांबरोबर किशोरवयीन मुलींचा सहभाग वाढत चालल्यामुळे भविष्यात हिरकणी कक्ष आणखी वाढवावे लागणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे पहिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

आषाढीवारीचा सोहळा यशस्वी केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे महिला व बालकल्याण अधिकारी मिरकले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी वारीत आलेले अनुभव कथन केले. पालखी सोहळा मार्ग व पंढरपुरातील पत्राशेड मधील दर्शन रांग या ठिकाणी आषाढी वारीच्या काळात जवळपास दीडशे हिरकणी कक्ष कार्यरत करण्यात आले होते. वारीमध्ये हिरकणी कक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे ठरली आहे. महिलांना आत्मसन्मान व सुरक्षा देणारा असा हा कक्ष आहे. पालखी सोहळ्या बरोबर महिला वारकरी 22 ते 45 दिवस पायी चालत आलेल्या असतात. या काळात त्यांना मासिक पाळीचा त्रास होतो. अशा संवेदनशील काळात महिलांना सुरक्षा देण्याचे काम हिरकणी कक्ष करत आहे. हिरकणी कक्षामध्ये आराम, आरोग्य सेवा यामध्ये प्रथमोपचार पेटी,गोपनीय कक्ष, स्वच्छतागृह, मुलांसाठी पाळणाघर व खेळण्याची व्यवस्था केलेली असते.

हिरकणी कक्षातील गोपनीय कक्षामध्ये महिला वारकऱ्यांसाठी शाॅनिटरी पॅड, हे पॅड वितरित करण्यासाठी वेंडर व नष्ट करण्यासाठी डिस्पोजल मशीन ठेवलेले असतात. त्यामुळे महिलांना एकदम सुरक्षित वातावरणाची निर्मिती केली जाते. पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात असे एकसे बेचाळीस हिरकणी कक्ष होते. यावेळेस जर्मन हँगर उभारण्यात आल्यामुळे यामध्ये हिरकणी कक्ष व्यवस्थितपणे उभारता आले आहेत. एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्यामुळे महिला वारकऱ्यांची यावेळेस चांगली सोय झाली. महसूल, जिल्हा परिषद, पोलीस आणि दिंडी प्रमुखांचा व्हाट्सअप ग्रुप करून यंत्रणा राबवल्यामुळे चांगला फायदा झाला.

गोपाळकाला होईपर्यंत हिरकणी कक्षांचे काम सुरू होते. पत्राशेड दर्शन रांगेत 28 हिरकणी कक्ष कार्यरत राहिले. यातून आरोग्य विभागाच्या तीन चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची जनजागृती ही करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबर आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी हिरकणी कक्षासाठी योगदान दिल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे मार्गदर्शन यासाठी महत्त्वाचे राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button