April 23, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

Wari: फूट मसाजरद्वारे वारकऱ्यांची सेवा केल्याचे समाधान

सोलापूर : यंदाच्या वारीत फूट मसाजरद्वारे वारकऱ्यांची चरणसेवा हा उपक्रम लक्षवेधी ठरला. ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी करून वारकऱ्यांची सेवा केल्याचे समाधान लाभल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामपंचायत विभागाच्या प्रभारी स्मिता पाटील यांनी व्यक्त केली.

आषाढीवारी यशस्वी केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला. प्रशासन विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचा सन्मान करण्याचा मान स्वीकारला. आषाढी वारीच्या अनुभवाबाबत बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील म्हणाल्या यापूर्वी माळशिरस बीडिओ म्हणून पालखी सोहळ्याचे नियोजन केल्याचा अनुभव होताच. त्यानंतर यावर्षी माऊलीच्या पालखीच्या नियोजनाचे जबाबदारी होती. पालखी मार्गावरील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या प्रयत्नातून बांधकाम विभागाने पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी उभे केलेले जर्मन हँगर लक्षवेधी ठरले. जर्मन हँगरमध्ये निवासासाठी आलेल्या वारकऱ्यांसाठी फूट मसाजर सेवा राबवली. पालखी मार्गावरील 81 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 400 फूट मसाजरद्वारे वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. वारीत पायी चालून दमलेल्या वारकऱ्यांना या सेवेचा चांगला फायदा झाला.

धर्मपुरीपासून वाखरी विसाव्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांचे सेवा केली. वारकऱ्यांना दिशादर्शक फलकही मार्ग दाखविणारे ठरले. वारीमध्ये महिला वारकऱ्यांसमोर चालण्याचे  भाग्य मिळाले. महिला वारकऱ्यांसमोर फुगडी खेळताना आपण अधिकारी आहोत, आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे हेही काही क्षण विसरता आले. आपला प्रपंच विसरून पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या महिला वारकऱ्यांची संवाद साधल्यानंतर मला स्वतःला नवीन ऊर्जा मिळाली. एक चांगले टीमवर्क झाले. वारकऱ्यांची स्वयंशिस्त पाहण्यासारखी होती. वारकऱ्यांच्या व्यवस्थेत महिनाभर व्यस्त असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही कर्तव्याबरोबर सेवेचे पुण्य मिळाले, असेही पाटील यांनी नमूद केले.

असा उत्साह पाहिला नाही…

    1. यंदा वारीला मोठी गर्दी होती. यापूर्वीही आषाढी वारीची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. पण यंदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी फूट मसाजरद्वारे वारकऱ्यांची केलेली चरण सेवा लक्षवेधी ठरली, अशी प्रतिक्रिया प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी अविनाश गोडसे यांनी दिली. विठू माऊलीच्या आवडीने पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांचे पाय थकले होते. त्यांना आराम देण्याचे भाग्य आम्हाला लाभले. ग्रामपंचायत विभागाचे प्रशासन अधिकारी जहीर शेख यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले हे येथे उल्लेखनीय. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून सेवेत कार्यरत असलेले अधिकारीही काही क्षण वारकऱ्यांबरोबर विठ्ठल नामात दंग झाले. झेडपीचे टीमवर्क राज्यात लक्षवेधी ठरले.