सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालयशिक्षण

कारमधून ऐटीत उतरल्या मॅडम, विद्यार्थी म्हणाले इंग्रजी शिकवतात सर

सोलापूर : कारमधून ऐटीत उतरल्या मॅडम आणि शाळेत आल्या. प्रत्यक्ष तपासणी सुरू झाल्यावर मात्र विद्यार्थी म्हणाले या मॅडमना आम्ही ओळखत नाही, इंग्रजी आम्हाला सर शिकवतात ही परिस्थिती आहे जिल्ह्यातील आश्रम शाळांची. महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या समितीने केलेल्या आश्रम शाळा तपासणी असे सत्य समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या समितीच्या तपासणीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जमाती कल्याण समितीच्या पथकाने जिल्ह्यातील आश्रम शाळांची तपासणी केली. मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथे असलेल्या आश्रम शाळेला या पथकाने अचानक भेट दिली तेव्हा या पथकाच्या समोरच एक कार वेगाने आली व त्यातून मॅडम उतरल्या. समितीचे सदस्य शाळेकडे जात असतानाच या मॅडम घाई घाईने शाळेत पोहचल्या. सदस्यांनी शाळेत प्रवेश करून मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये ठिय्या मारला. मुख्याध्यापकाकडून शिक्षकांची माहिती घेतली. त्यावेळी त्या मुख्याध्यापकाने शिक्षक व विद्यार्थी संख्येची माहिती दिली. प्रत्यक्ष तपासणी करीत असताना कारमधून आलेल्या त्या मॅडम खूपच भांबावलेल्या दिसल्या. त्या मॅडम कोणता विषय शिकवतात असे विचारल्यावर मुख्याध्यापकाने इंग्रजी विषय असे सांगितले. ही गडबड समितीच्या सदस्यांना लक्षात आली होती. सदस्यांनी मुख्याध्यापकांना वारंवार कोणते विषय कोणते शिक्षक शिकवतात अशी विचारण केली. मुख्याध्यापकाची मोठीच पंचायत झाली होते तरीही त्यांनी ठामपणे शिक्षकांचे विषय सांगितले. पथकाने मात्र त्या मुख्याध्यापकाचीच परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी त्या मॅडमला इंग्रजी विषय कोणत्या इयत्तेवर शिकवता असे विचारल्यावर त्यांच्याकडून जे उत्तर आले त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना तेथे बोलवण्यात आले. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षक कोण विचारल्यावर जे उत्तर आले त्यातून या शाळेची पोलखोल झाली. विद्यार्थी म्हणाले इंग्रजी विषय आम्हाला सर शिकवतात, मुख्याध्यापकांनी तर मॅडमचे नाव सांगितले होते. मॅडम नवीनच नियुक्त झाल्या आहेत, अशी सावरा सावर करण्याचा त्या मुख्याध्यापकाने प्रयत्न केला. तपासणी शाळेत अनेक गडबडी दिसल्या. समितीने या गडबडीची नोंद घेतली व या शाळेची चौकशी लावली आहे.

समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांनी जिल्ह्यात असलेल्या 97 आश्रम शाळेत गडबडी असल्याचे स्पष्ट केले आहे. या शाळांमध्ये 1513 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत वेतनावर 15 कोटी 13 लाख खर्च होत आहेत या शाळेमधून 22,990 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे यातील निवासी विद्यार्थ्यांची संख्या 10,537 इतकी आहे विद्यार्थ्यांना दरमहा दोन कोटी इतके अनुदान वितरित केले जाते. या समितीने तीन दिवस जिल्ह्यात दौरा करून यातील अनेक शाळांची तपासणी केली. पण या शाळांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे कांदे आणि स्पष्ट केले आहे. अनेक आश्रम शाळा मुख्याध्यापकांच्या संस्था आहेत तर या शाळेत मुख्याध्यापकांची पत्नी शिक्षिका आहे व नातेवाईक नियुक्त करण्यात आले आहेत. यातील बरेच जण शाळेवर येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मोठे दुर्लक्ष असल्याचे चित्र या आश्रम शाळातील आहे. समितीने चौकशी केल्यानंतर आता प्रत्येक आश्रम शाळांची चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे बोगस आश्रम शाळेचा कारभार करणाऱ्यांची आता झोप उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button