सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापुरातील शिक्षण संस्थाचालक हैराण ; सेवकसंचात त्रुटी,पोर्टलवरील जाहिराती रद्द

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शासनाकडे अडचण मांडण्याचे दिले आश्वासन

सोलापूर : जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांनी अनुदानित शाळेतील ऑनलाईन सादर केलेल्या संचमान्यता मंजुरीत घोळ घालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिराती रद्द केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थाचालक हादरले आहेत. मुख्याध्यापकांनी मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची भेट घेत यावर मार्ग काढण्याची विनंती केली आहे.

सन 2018 पासून खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कर्मचारी भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक खाजगी शाळांमध्ये पदे रिक्त झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत शिक्षण संस्था चालकांनी वारंवार फॉलोअप घेतल्यानंतर शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करून कर्मचारी भरती करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी सन 23- 24 च्या संचमान्यतेनुसार कर्मचारी भरती करण्यास सुचविण्यात आले आहे. सेवक संच मान्यतेसाठी शासनाने ऑनलाईन माहिती भरून घेतली. 22 एप्रिल रोजी शासनाने सेवक संच जाहीर केला आहे. माहिती 23- 24 च्या संच मान्यतेसाठी भरलेली असताना शिक्षण विभागामार्फत 24 -25 चा सेवक संच मंजूर करण्यात आला आहे. या सेवक संचामध्ये अनेक त्रुटी काढत दोन महिन्यापूर्वी राज्यातील शिक्षण संस्थांनी कर्मचारी भरतीसाठी दिलेल्या जाहिराती रद्द केल्या आहेत. सेवक संचात त्रुटी काय काढल्या याचीही शिक्षण संस्थांना माहिती दिलेली नाही. राज्यभर हा घोळ झाल्याने अनेक शिक्षण संस्थाचालक हैराण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 38 शिक्षण संस्थांमधील सेवक संचात त्रुटी काढून अनेक पदे रद्द केली आहेत. याशिवाय पोर्टलवर दिलेल्या जाहिरातीतील पदाबाबत अर्ज केलेल्यांची जूनमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सेवक संच व पोर्टलमधील चुका सुधारण्यास संस्थांना संधीच देण्यात आलेली नाही. पदे रद्द झाल्यास जूनमध्ये शाळा कशा सुरू करायच्या असा सवाल अनेक संस्था चालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हैराण झालेल्या मुख्याध्यापकांनी मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची भेट घेत कैफियत मांडली. यामध्ये मुख्याध्यापक संघाचे सुभाष माने, तानाजी माने, श्रीधर उन्हाळे, विलास वसेकर, माढ्याचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे  यांच्यासह इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य शिक्षण विभाग स्तरावरून ही कार्यवाही झाली आहे. तुमच्या अडचणी शासनाला कळविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण अधिकारी जगताप यांनी मुख्याध्यापकांना दिले आहे.

 राज्यभर सेवकसंच व पवित्र पोर्टलचा गोंधळ निर्माण झाला आहे. जिल्ह्यात माध्यमिक शाळांमधील 1000 पदे रिक्त आहेत पण नव्या सेवक संचात अनेक पदे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी शाळा कशा चालवायच्या? त्रुटी काय काढल्या? हेही संस्थाचालकांना कळविले नाही. पोर्टलवरील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे.

सुभाष माने,

जिल्हा मुख्याध्यापक संघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button