सोलापूरक्रीडा

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीची राष्ट्रीय स्पर्धेत दोन पदकांची कमाई

सोलापूर : चेन्नई येथील एस.आर.एम. विद्यापीठाच्या डॉ. टी. पी. पारिवेंधर एक्वेटिक कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या ७९ व्या सिनियर नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्रावणीने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकासह थेट ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया’ (Best Diver of India) हा सर्वोच्च बहुमान पटकावला आहे.

७ ते १० जुलै दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी श्रावणीने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात तिने १६६.२० गुण मिळवत महाराष्ट्रासाठी पहिले सुवर्ण पदक निश्चित केले. तिच्या या सुरुवातीच्या यशामुळे महाराष्ट्राच्या संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपली विजयी घौडदौड कायम ठेवत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या हायबोर्ड डायव्हिंग प्रकारात श्रावणीने १८६.५० गुणांची कमाई करत रौप्य पदक आपल्या नावावर केले. आजवरची उत्कृष्ट कामगिरी आणि या राष्ट्रीय स्पर्धेतील या दोन पदकांच्या जोरावर तिला स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया’ ची प्रतिष्ठित ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राला सांघिक उपविजेतेपद

श्रावणीने मिळवलेल्या या दोन पदकांमुळे महाराष्ट्राला “डायव्हिंग वूमन ओव्हरऑल रनर्स” (सांघिक उपविजेतेपद) ही टीम ट्रॉफी मिळवण्यात यश आले. महाराष्ट्राला हे सांघिक यश मिळवून देण्यात श्रावणीचा वाटा अत्यंत मोलाचा ठरला. श्रावणीच्या यशामागे तिचे खडतर परिश्रम आणि प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button