सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उजनी येथून सोलापूरला पाईपलाईन आणून पन्नास वर्षे अधिराज्य गाजवलं. आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनीवरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.सत्ता मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी सात वर्षात हजारो कोटींचा निधी त्यांनी आणला. दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ३५ वर्ष ज्यांनी वापरला व ज्यांनी महापालिका ओरबाडून खाल्ली त्यांना देशमुख यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार काय? असा सवाल कोठे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यापारी मेळाव्यात उपस्थित केला.
भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी माहितीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी सम्राट चौकातील महेश गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रामवल्लभ जाजू, कैलास कोठारी, अभय सुराणा, इंदरमल जैन,पुरुषोत्तम धुत, ब्रिजमोहन फोफ्लिया,निलेश भंडारी, केतन शहा, गुंडू शर्मा, दीपक मुनोत, आनंद शर्मा,चेतन पाटील,जयचंद्र वेद, सुहास कदम, अशोक चव्हाण, अमर पुदाले,जुमलजी करावा, श्रीनिवास दायमा, रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चंदनशिवे म्हणाले की, शहर उत्तरमध्ये भाजपची विचारधारा असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमदार देशमुख हे विक्रमी मतांनी निवडून येतील. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये मालक शपथ घेतील हे आम्हाला पाहायचे आहे. शहरातील व्यापाऱ्यांना हवे तेव्हा पाहिजे ती मदत मालकांनी वेळोवेळी केली आहे. वेळप्रसंगी कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासही सांगितले. मागील पंधरा वर्षापासून मी महानगरपालिकेच्या सभागृहाचा साक्षीदार आहे. देशमुख मालकांनी भाजपची सत्ता आल्यावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून सांगितले. जनतेसाठी काम करा, कोणत्याही चुकीच्या कामांना पाठीशी घालू नका, पैशाच्या मोहात पडू नका. चांगले काम करा नाव कमवा, मी तुम्हाला पैसे देतो. स्टॅंडिंग सभागृह, महापौर पदाच्या कार्यकाळात कोणतेही आर्थिक विषयाच्या मागे लागू नका असा सांगणारा आमदार मी जवळून पाहिला आहे. टक्केवारी न घेणारा आमदार म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.मागील २० वर्षात २५ हजार पेक्षा रुग्णांवर हृदयाचे ऑपरेशन, कॅन्सरच्या उपचारासाठी आणि डोळ्यांचे ऑपरेशन मालकांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत घडवून आणले आहेत. आमदार देशमुखांनी कधी कामाची प्रसिद्धी केली नाही. त्यांना ते आवडतही नाही. “हाथी चलता है,कुत्ते भोगते है’, या उक्तीप्रमाणे मालकांनी प्रसिद्धीच्या मागे लागून स्वतःचं कौतुक करून घेतल नाही. मालकांना जाब विचारणाऱ्यांनी तुम्ही कधी कुठल्या गरीबाचा दवाखान्याचा खर्च केलात का ? कुठल्या गरिबाला ऑपरेशनसाठी मदत केलीत का ? उजनीवरून येणारी दुहेरी पाईपलाईनचे काम ९०% झाले असून थोड्या दिवसातच काम पूर्ण होऊन शहराचे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. याचाही गवगवा कधी आमदार देशमुखांनी केला नाही. ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता ३५ वर्ष होती, दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ज्यांच्या हातात होता. ज्यांनी महापालिका ओरबडून खाल्ली, त्यांनी स्वतः काय केलं? याचा आधी हिशोब द्यावा, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली.
मेळाव्यामध्ये उत्तर देताना आमदार देशमुख म्हणाले की पुढील पाच वर्षात सम्राट चौक परिसराला छत्रपती संभाजी महाराज चौकाप्रमाणे सुशोभीकरण करू. या भागातील राहिलेल्या नागरि समस्यांची पूर्तता करू. स्मार्ट सिटीमुळे अनेक चांगली कामेही झाली आहेत. सोलापूरच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हजार कोटीचा निधी आणला आणि आता ते काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल. भाजप पक्षाने मला उत्तरमधून पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे. तुम्ही सर्व जनता माझ्या पाठीशी असल्याने ही संधी मला पुन्हा मिळाली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे तुमची साथ अशीच राहू द्या. राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी आपण आम्हाला मतदान करावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास शहरातील व्यापारी वर्ग रेडीमेड कारखानदार कापड व्यापारी टेक्सटाईल व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.