सोलापूरक्राईम

बोरामणीत तलवारीने वार करून माय लेकरांसह तिघांचा खून

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात हैदराबाद महामार्गावर असलेल्या बोरामणी गावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या तिहेरी हत्याकांडाने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे.

या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी हे तिन्ही मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे हलविले आहेत. यावेळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली आहे. यात गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रिया सुधाकर मस्के आणि मुलगा शिवराय सुधाकर मस्के अशा तिघांचा क्रूरपणे खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री जेव्हा संपूर्ण गाव साखर झोपेत होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मस्के यांच्या घरावर हल्ला चढवला. धारदार तलवारीने केलेल्या या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

रात्री नेमकं काय घडलं? 

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे स्वरूप इतके भीषण होते की, प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे आले. गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया या दोघींचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर मुलगा शिवराय याचा मृतदेह बैठकीच्या खोलीत आढळून आला. हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे मृतदेहांच्या स्थितीवरून दिसून येत होते.  या घटनेत मरण पावलेली प्रिया ही बारावीत शिक्षण घेत होती, तर शिवराय हा दहावीचा विद्यार्थी होता. दोघांनेही बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बोरामणी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार मस्के कुटुंबीयाचे तीन घरे एकमेकाला लागून आहेत. त्यांच्यात शेतजमिनीवर वाद सुरू होता. त्यातून हे कृत्य घडले असावे असा अंदाज आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या तिहेरी कोणाची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button