सोलापूर : कधी काँग्रेस, कधी शिवसेना अन् आता तुतारी वाजवत बसलेत. सोलापूरकरांना फक्त वेड्यात काढण्याचे काम ते करत आहेत. महापालिका लुबाडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.

गुरूवारी संध्याकाळी महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन समाधान आवळे मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले की या भागाचे गेल्या १५ वर्षांपासून मी नेतृत्व करत आहे. सुरवातीला या भागात काम करताना खूप अडचणी येत होत्या. परंतु तरीही तीन नगरसेवक निवडून आणले. आतापर्यंत मातंग वस्तीसाठी मी कोट्यवधींचा निधी आणला आहे. स्वाती समाधान आवळे गेल्या ५ वर्षांपासून आमच्यासोबत काम करत आहेत. सरकार दरबारी भांडून आम्ही आपल्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले.

विरोधकांनी संविधान बदलण्याची खोटी अफवा पसरविली. कुण्याचा बापात हिंमत नाही संविधान बदलण्याची.अफवांवर विश्वास ठेवू नका, भाजप संविधानाचे पालन करणारा पक्ष आहे असे देशमुख म्हणाले.

विरोधी उमेदवार महेश कोठे यांचे नाव न घेता आमदार देशमुख यांनी भाजपावर बोलू नये असा समाचार घेतला. आधी काँग्रेस नंतर शिवसेना अन् आता तुतारी वाजवत बसलेत. आतापर्यंत त्यांनी फक्त महापालिका लुटण्याचे काम केले. महापालिका लुबाडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन देशमुख यांनी नागरिकांना केले. विरोधकांना फक्त टीका करता येते, विकास करता येत नाही. पण आम्ही नक्की या भागाचा विकास करु. या परिसरातील प्रत्येकाला पंतप्रधान आवास योजनेतून नक्कीच पक्की घरी देण्याचा शब्द यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख यांनी दिला.

 

यावेळी व्यासपीठावर अनंत जाधव, दशरथ कसबे, माजी नगरसेविका स्वाती आवळे, समाधान आवळे, यांच्यासह आयोजक यांची प्रमुख उपस्थिती होती.समाधान आवळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आमच्या अनेक भगिनी हजार पंधराशे रुपयेसाठी अनेक घरांमध्ये धुणी भांडी करतात. महायुती सरकारने प्रत्येक महिलेचा सन्मान केला आहे. पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असून आपण पण मुख्य प्रवाहात येऊन भाजपच्या मागे आपली शक्ती द्यावी. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आपल्या दलित वस्तीमध्ये सुधारणा झाली नाही. कोणता निधीही आला नाही. मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कोट्यावधीचा निधी आणून विकास करून आणला आहे. आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याच आवाहन यावेळी समाधान आवळे यांनी केलं.कार्यक्रमास परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आभार गौतम कसबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *