सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी मनिषा महेश माने उर्फ मुसळे (वय-45 वर्ष, रा-80, बसवराज नेले नगर, जुळे सोलापुर) हिला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी रविवारी दिला.
सदर बाझार पोलिसांनी डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी मनीषा हिला रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे, श्रीपाद देशक, सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे शिल्पा बनसोडे यांनी बाजू मांडली.
न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर आरोपीतर्फे बाजू मांडण्यात आली. एफ.आय.आर. चे अवलोकन केले असता आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले याबाबत कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही. आरोपाप्रमाणे दिनांक 17 एप्रिल रोजी महिला आरोपी मनीषा यांनी डॉक्टर वळसंगकर यांच्या अधिकृत ईमेलवर पत्र पाठवले, त्यामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये तिचे अधिकार कमी केल्याबाबत, तिचा पगार कपात केला जातो, वगैरे त्यामुळे ती आत्महत्या करणार असून त्यामध्ये डॉक्टर वळसंगकर यांचे नाव घेणार आहे, अशा आशयाचा मेल पाठवला. तदनंतर दिनांक 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर व त्यांच्या पत्नीने आरोपी महिलेस हॉस्पिटलमध्ये बोलावून समजावून सांगितले, त्यावेळी आरोपीने तिची चूक झाल्याचे सांगून माफी मागितली, पत्र फाडून टाकले, तदनंतर सायंकाळी डॉक्टर वळसंगकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
डॉक्टरांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये नमूद आहे की, “ज्या माणसाला मी शिकवून आज A.O. केले आहे आणि चांगला पगार देतो आहे त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, याचे मला आतीव दुःख आहे आणि म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.” सदर चिट्ठीच्या आधारे आरोपी महिलेला सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. तपास अधिकारी पो. नि. लकडे यांनी चिठ्ठी जप्त करावयाची आहे, प्रकरणाचा तपास करावयाचा आहे, ईमेलद्वारे पाठवलेली सदर चिठ्ठीची प्रत जी महिला आरोपीने फाडली, त्याचे तुकडे जप्त करायचे आहेत, घाणेरडे व खोटे आरोप याबाबत तपास करावयाचा आहे, त्यासाठी आठ दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे अशी पोलीस कोठडीची कारणे मांडली.
यात आरोपीतर्फे पोलीसांनी मागितलेल्या पोलीस कोठडीच्या मागणीस विरोध करून युक्तिवाद करण्यात आला की, “पोलिसांचे कथनानुसार ईमेलद्वारे पाठवलेली चिठ्ठी जप्त केली आहे. त्यामुळे ते पोलीस कोठडीचे कारण होऊ शकत नाही, सदर चिठ्ठी ज्या हॉस्पिटलमध्ये फाडली ते हॉस्पिटल फिर्यादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे ते सुद्धा आरोपीच्या पोलीस कस्टडीचे कारण होऊ शकणार नाही, पाठवलेला मेल हा टाईप असल्यामुळे आरोपीचे हस्ताक्षर घेण्याची गरज नाही, सदर प्रकरणात वस्तुस्थिति वेगळी आहे. ती लपविण्यासाठी खोटी फिर्याद आरोपीविरुद्ध केली आहे असा बचाव करण्यात आला. आरोपी व फिर्यादी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी अंत्यविधीला होती हजर
डॉ. वळसंगकर यांच्या अंत्यविधीला आरोपी मनीषा हजर होती. ती रडत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. तिचे वकील प्रशांत नवगिरे म्हणाले हॉस्पिटल व्यवस्थापनाने तिचे अधिकार व पगार कपात केल्यामुळे ई-मेल मध्ये तिने आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यात तरी कोणताही वैयक्तिक गंभीर आरोप दिसत नाही. त्यामुळे पोलीस तपासात आता पुढे काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ