सोलापूरमहापालिका

पावसामुळे पाणी भरपूर पण विजेने बिघडवले सोलापूरच्या पाण्याचे वेळापत्रक

भर पावसात अधिकाऱ्यांची सुरू आहे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कसरत

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा प्रश्न काही अंशी सुटला असून आता पाणी भरपूर असतानाही सोलापूरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वादळी वारा व पावसाने वीज पुरवठा खंडित होत असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यात उजनी धरण मायनसवर गेल्याने  तिबार पंपिंग करून सोलापूरकरांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. आता गेल्या चार दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे उजनी धरण क्षेत्रातील चांगला पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सोलापूरला पाणीपुरवठा करणारे टाकळी बंधारा व हिप्परगा तलावातही पावसाचे पाणी आले आहे. पावसाळी वातावरणामुळे सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याची मागणी घटली आहे. असे असताना पाणीपुरवठ्यावर परिणाम होतच आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पावसामुळे आता विस्कळीत झाला आहे. मंगळवारी जुळे सोलापूर, होडगी रोड परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी आले आहे. टाकळी पंपग्रहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे पाणी वितरण अधिकारी तपन डंके यांनी सांगितले. पाणी उशिरा येत असले तरी कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे भर पावसात पाणी वितरणचे अधिकारी सर्वत्र फिरून पाण्याचा योग्य दाबाने पुरवठा करण्यावर भर देत असल्याचे चित्र दिसून आले. पावसाच्या दमदार हजेरीमुळे पाणीटंचाई दूर होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेले पाणी टँकर गरज नसतील तर काढून घेण्यात यावेत अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनीही केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button