महापालिकासोलापूर

जुळे सोलापुरातील रस्त्यावरील खड्डे जैसे थे… ठेकेदाराने हलवलेला मिक्सर पुन्हा रस्त्यावर

सोलापूर: महापालिका आयुक्त ओंबासे यांचे हद्दवाढ विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पावसाळा संपल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवायचे नाटक झाले पण जुळे सोलापुरातील रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. विशेष धक्कादायक बाब म्हणजे पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी आणलेला मिक्सर गायब झाला होता तो पुन्हा रस्त्यावर आला आहे.

सोलापुरात सध्या जुळे सोलापूरकर धुळ व रस्त्यावरील खड्ड्याने त्रस्त आहेत. महापालिकेने सलग तिसऱ्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर ड्रेनेजची कामे हाती घेतली. दावत चौक ते भंडारी मैदान आणि सैफुल ते नेहरूनगरदरम्यान ड्रेनेज खोलायची मोठे कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे रस्ते धुळीने माखले आहेत. पावसाळा संपल्यानंतर लगेच हिवाळ्यात ही कामे हाती घेतल्याने सगळीकडे धूळ धूळ असून यामुळे नागरिकांना फुफुसाचे आजार जडले आहेत. यंदा भरपूर पाऊस झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. पाऊस सुरू असतानाच जुळे सोलापुरातील वाईट हाऊससमोर खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने मिक्सर व टामराचे कॅन आणून ठेवले. काम सुरू केल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली त्यामुळे हे काम अर्धवटच पडले. पाऊस बरेच दिवस सुरू असल्याने ठेकेदाराने हळूच येथून मिक्सर हलविला. खडी व डांबराचे कॅन मात्र येथेच पडून होते. पाऊस थांबल्यानंतर नगर अभियंता कार्यालयाने येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले. पण अंतर्गत रस्त्यावरील खड्डे कोण बुजवणार हा प्रश्न निर्माण झाला. ठेकेदाराने खड्डे बुजवण्याचे काम अर्धवटच ठेवले. काही दिवसापूर्वी या ठेकेदाराने नेलेला मिक्सर पुन्हा जागे आणून उभा केला आहे. काम झाले असे दाखवून बिल काढण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा होत आहे.

सिमेंटच्या रस्त्याचे खड्डे कोण बुजवणार?

जुळे सोलापुरातील अंतर्गत रस्त्यांच्या खड्ड्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या निधीतून जुळे सोलापुरात अंतर्गत सिमेंटचे रस्ते झाले आहेत. पावसाने सिमेंट व खडी वाहून गेल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. आता या सिमेंट रस्त्यावरील खड्डे कोणी बुजवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सिमेंट रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची महापालिकेकडे यंत्रणाच नसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button