सोलापूरक्राईम

सोलापुरात निवृत्त बँक मॅनेजरला सायबर भामट्याकडून 60 लाखाची टोपी

सोलापूर : सायबर भामट्याने सोलापुरातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या बँक मॅनेजरला शेअर मध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करून देण्याची लालूच दाखवून साठ लाखाला गंडविल्याचे समोर आले आहे.

फसवणूक झालेल्या त्या सेवानिवृत्त बँक मॅनेजरने पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाला संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या बँक मॅनेजरला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. हे रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीने फेसबुक वरून त्यांच्याशी जवळीक साधली. मी शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार आहे. शेअर मध्ये पैसे गुंतवल्यावर महिन्याला दाम-दुपटीने परतावा मिळतो अशी थाप त्याने मारली. त्यानंतर त्याने त्यांना एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतले. या ग्रुपवर पैसे गुंतवल्यावर दाम दुप्पट पैसे मिळाल्याचे बोगस लाभार्थ्यांचे व्हिडिओ टाकले. त्याच्या या आमिषाला भुलून संबंधित अधिकाऱ्याने पहिल्यांदा तीस हजार गुंतवले. महिनाभरातच चांगला परतावा मिळाल्याचे त्याला मेसेज आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने आपल्या जवळील जवळपास 59 लाख 90 हजार रुपये त्याच्याकडे गुंतवले. जून 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी ह्या रकमा गुंतवल्या. पण नंतर परतावा येण्याचे बंद झाल्यावर त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्या व्यक्तीने दाद दिली नाही. यातून आपले मोठे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या अधिकाऱ्याने सायबर क्राईमकडे धाव घेतली आहे. सायबर कक्षाकडून संबंधित व्यक्तीच्या तक्रारीबाबत खातरजमा करण्यात येत असून याबाबत लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा सायबर चोरापासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button